प्रवीण पोटे यांचा दणदणीत विजय
अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग तिसर्यांदा निवडणूक जिंकण्याचा विक्रम

प्रवीण पोटे यांनी पुन्हा इतिहास रचला
सलग तिसर्यांदा ‘क्लीन स्वीप’ करत विजय संपादन
421 वैध मतांपैकी विक्रमी 390 मते मिळवली
6 मते अवैध ठरवून बाद करण्यात आली
वंचित आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली
काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांना मतांचा भोपळा
अमरावती /22 जून– स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जून रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी एकूण 421 वैध मतांपैकी 390 मते मिळवत एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग तिसर्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे. तसेच, सलग दुसर्यांदा ’क्लीन स्वीप’ करत निवडणूक जिंकण्याचा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला आहे. 18 जून रोजी झालेल्या मतदानामध्ये जिल्ह्यातील एकूण 451 पैकी 427 मतदारांनी भाग घेतला होता. त्यांच्याद्वारे मतदान पेटीत टाकलेली मते कडेकोट सुरक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली होती. आज सकाळी 8 वाजता सर्व नियमांचे पालन करत मतपेट्या मतमोजणी केंद्रावर आणण्यात आल्या. त्यानंतर वैध आणि अवैध मतांची छाननी करून 427 पैकी 6 मते अवैध ठरवून बाद करण्यात आली आणि 421 मते वैध मानून मतमोजणी सुरू करण्यात आली. या निवडणुकीत मतदारांना पसंतीक्रम नोंदवायचा होता, कारण रिंगणात एकूण 3 उमेदवार होते. प्रवीण पोटे पाटील यांनी पहिल्या पसंतीची विक्रमी 390 मते मिळवली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रवीण पोटे पाटील यांना विजयी झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह. पि. तुम्मोड उपस्थित होते. या प्रसंगी विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर ध्यार, प्रसेनजित चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि दादासाहेब दराडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. भाजपच्या या एकतर्फी विजयामुळे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची पकड मजबूत असल्याचे मानले जात आहे. या निकालाने विरोधी पक्षांपुढे अनेक राजकीय प्रश्न उभे केले आहेत, विशेषतः काँग्रेस उमेदवाराला एकही मत न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विधान परिषदेसाठी एकूण 453 मतदार होते. दर्यापूर नगर परिषद आणि धारणी नगर पंचायतीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे निधन झाल्यामुळे 451 मते वैध मानली गेली. यामध्ये भाजपची स्वतःची 150 मते होती. महायुतीमधील अजित पवार गटाचे 33, युवा स्वाभिमानी पक्षाचे 26, प्रहार पक्षाचे 21 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे 18 सदस्य मिळून महायुतीकडे 248 मते होती, जी विजयासाठी पुरेशी होती. दुसरीकडे, काँग्रेसकडे 120 मतदार होते, तर काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीतील सेना (उबाठा) कडे 22 आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे 11 सदस्य होते. याव्यतिरिक्त एमआयएमकडे 16 सदस्य होते, तर बसपा, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष सदस्यांची संख्या 36 होती. म्हणजेच भाजपविरोधी मतांची एकूण संख्या 205 होती. हे पाहता प्रवीण पोटे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की भाजपविरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनीही प्रवीण पोटे पाटील यांच्या बाजूने मतदान केले आहे.
काँग्रेसचा तटस्थ राहण्याचा निर्णय आणि नगरसेवकांचे ‘फिफ्टी-फिफ्टी’ पालन-काँग्रेसने नागपूरचे हर्षजीत देशमुख यांना उमेदवार केले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच हर्षजीत देशमुख अचानक निवडणुकीच्या रिंगणातून गायब झाले. ते आजारी असल्याचे सांगत नागपूरच्या रुग्णालयात दाखल झाले होते. यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली. काँग्रेसने आपल्या मतदारांना तटस्थ राहण्याचे निर्देश दिले होते. शहर काँग्रेस कमिटीने व्हीपही जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी या निर्देशांचे उल्लंघन केले. अमरावती मनपाच्या 17 पैकी 6 काँग्रेस नगरसेवकांनी आणि वंचित आघाडीच्या एका नगरसेवकाने मतदानात भाग घेतला. तसेच 10 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींमधील अनेक नगरसेवकांनी मतदान केले. परंतु काँग्रेस उमेदवाराला एकही मत पडले नाही. यामुळे काँग्रेसच्या निर्देशांचे पालन न करता मतदानात सहभागी होऊनही हर्षजीत देशमुख यांना मत न देणे, हे एका प्रकारे पक्षाच्या निर्देशांचे ’फिफ्टी-फिफ्टी’ पालन असल्याचे मानले जात आहे.
हर्षजीत देशमुख यांचा ‘डक आऊट’चा अनोखा विक्रम
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना काँग्रेसच्या एकाही नगरसेवकाचे मत मिळाले नाही. विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला एकही मत न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे शहर आणि जिल्हा काँग्रेस नेत्यांची आपल्या नगरसेवकांवरची पकड ढिली झाली असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसचे नगरसेवक कोणाला मतदान करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निलेश विश्वकर्मांना 31 मते कोणाची?
विधान परिषद निवडणुकीत भाजपविरोधी कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला नव्हता आणि कोणालाही ’व्हीप’ बजावला नव्हता. काँग्रेस सोडून इतर पक्षांनी आपल्या सदस्यांना अंतरात्म्याच्या आवाजावर मतदान करण्यास सांगितले होते. एकीकडे प्रवीण पोटे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असताना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा किती मते घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु आश्चर्यकारकपणे निलेश विश्वकर्मा यांनी 31 मते मिळवली आहेत. आता ही मते नेमकी कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांकडून मिळाली, याची चर्चा रंगली आहे.




