विदर्भाच्या हक्कासाठी लढणारा बुलंद अभ्यासू आवाज हरपला
प्रा.बी टी देशमुख यांचे निधन

आज सांयकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार
अमरावती /19 जून- अमरावती : विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलन महर्षी व गाढे अभ्यासक माजी आमदार प्रा. बी. टी. उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. शनिवार 20 जून रोजी सांयकाळी 5 वाजता त्यांच्यावर अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगी, भाऊ नाना देशमुख यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघाचे ते सलग 6 वेळा आमदार राहीले आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते. सरकारला अनेक शैक्षणिक सुधारणा करण्यास बाध्य करून शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या. विशेष म्हणजे विदर्भाच्या सिंचनासह अन्य क्षेत्रातल्या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी अभ्यासपूर्ण समोर आणला होता. विदर्भाचा उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वच क्षेत्रातला विकासाचा अनुशेष किती तीव्र आहे, या संदर्भात त्यांनी सखोल मांडणी वेळोवेळी केली. तेव्हा विधीमंडळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी. टी. देशमुख यांच्या मुद्दाला बळ दिले होते. परिणामस्वरूप तत्कालीन काँग्रेस शासनाला बी. टी. यांच्या मागण्यांची वेळोवेळी दखल घ्यावी लागली. अमरावती शहरासह अन्य शेकडो गांवाची तृष्णातृप्ती करणारे अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. पेढी धरणासाठी त्यांचा आग्रह होता. कोळशावर आधारीत नांदगाव पेठ येथील रतन इंडीय औष्णीक विद्युत प्रकल्पाला त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. नैतिकता जोपासून त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. अनेकांच्या ते आदर्शस्थानी होते. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना ह्रदयाचा त्रास होता. शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता त्यांना तीव्र धक्का बसाला त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
एक पर्व संपले…- मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली
विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि लोकहितासाठी अखंड लढणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, आकडेवारीसह मांडलेले मुद्दे आणि विदर्भाच्या सिंचन, पाणी, रस्ते व भौतिक अनुशेषाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नेहमीच मार्गदर्शक ठरला. एखादा प्रश्न ताकदीने मांडून तो मार्गी लागेपर्यंत शांत न बसणे, ही त्यांची कार्यशैली होती. प्रा. देशमुख यांच्याकडून विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त, विषयांचा सखोल अभ्यास आणि जनहितासाठीची निष्ठा याबाबत अनेकांना शिकण्याची संधी मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली-मिळाली. विदर्भाच्या विकासासाठी लढणारा एक जिगरी नेता आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे पर्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रा. बी. टी. देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे.
खंबीर नेतृत्व हरपले- ना.नितीन गडकरी
ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ व माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक वर्षं विधिमंडळात सोबत काम करताना बी टी देशमुख यांच्याशी माझे अतिशय निकटचे आणि मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. दीर्घकाळ विधिमंडळात शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना देशमुख यांनी विनाअनुदानित शाळा, शिक्षक व प्राध्यापकांच्या हक्कासाठी मोठा संघर्ष केला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडणारे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. विदर्भावरील अनुशेष दूर करण्यासाठी बीटींनी विधिमंडळात केलेली अभ्यासपूर्ण भाषणे ही प्रत्येक विधिमंडळ सदस्यासाठी प्रेरणादायी आहेत. अत्यंत अभ्यासू आणि संसदीय परंपरांचा आग्रह धरणार्या ना.नितीन गडकरी-देशमुख यांनी विदर्भातील आणि एकूणच राज्यातील मागासलेल्या भागांच्या विकासासाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या जाण्याने केवळ अमरावतीचेच नव्हे, तर सबंध महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती
महान शिक्षक व निष्कांचन लोकप्रतिनिधीला मुकलो!
पालकमंत्री बावनकुळे यांची बी टी देशमुख यांना श्रद्धांजली प्रा. बी टी देशमुख यांचे आपल्यातून जाणे म्हणजे विकासाच्या निर्मळ विचाराला मुकणे आहे, अशी भावना व्यक्त करून महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपण एक महान शिक्षक व निष्कांचन लोकप्रतिनिधीला गमावले आहे अशी शोकसंवेदना व्यक्त केली.आपल्या शोक संदेशात पालकमंत्री बावनकुळे म्हणतात की, प्रा. बी. टी. देशमुख विदर्भाचे त्रिकालदर्शी वैभव. होते. बाणेदार आणि पाणेदार माणूस असलेले बीटी देशमुख सामाजिक जाणिवांचे निरामय आणि राजकारणातील निरागस व्यक्तित्व होते. सार्वजनिक आयुष्य कसे असावे, याचा आरस्पानी वस्तुपाठ म्हणजे सरांचे जगणे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख, शिवाजीराव पटवर्धन यांच्या विचारांचे पाईक असलेल्या बीटी देशमुखांनी सलग पाच वेळा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. शिक्षण, पाणी, रोजगार आणि उद्योग ही त्यांची राजकीय व सामाजिक चतुसूत्री. नुटा या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांसाठी केलेले कार्य अजरामर आहे. ते अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. ते 30 वर्षे आमदार असतानाही त्यांनी वर्गात जाणे थांबविले नव्हते. हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले.
विदर्भाच्या मागास भागाला समृद्धतेचे बळ मिळावे, त्यांनी विदर्भ अनुशेषाचा संघर्ष सुरू केला. देशाचे लक्ष वेधले. विकासाच्या आठ निर्देशांकांत विदर्भाला स्थान मिळवून देणारी चिवट लढाई त्यांनी लढली. मा. नितीनजी गडकरी, मा. देवेंद्रजी फडणवीस हेही या संघर्षात त्यांच्या सोबत होते. वैधानिक विदर्भ विकास मंडळाची निर्मिती ही बीटीसरांची देण आहे. नागपूर- मुंबई विदर्भ एक्सप्रेस असावी ही त्यांचीच संकल्पना. या बाणेदार नेत्याने दुष्काळी अमरावती जिल्ह्याला पाणी मिळवून दिले. विदर्भाला संतुलित विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे जाणे विकासाच्या निर्मळ विचाराला मुकणे आहे.मी अमरावतीचा पालकमंत्री म्हणून या महान शिक्षक व निष्कांचन लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली अर्पण करतो.
अनुभवी अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले
माजी आमदार बी टी देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे अमरावती पदवीधर मतदारसंघातून ते सलग 6 वेळा आमदार (विधान परिषद) म्हणून. निवडून आले होतेशिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे आणि विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा आक्रमकपणे मांडणारे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ते ओळखले जात असत एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती एका दैनिकामध्ये त्यांनी अनेक वर्ष त्या काळात पत्रकारिता केली होती त्यांच्या निधनामुळे आज अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्यतुन हरपले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलो
आ प्रतापदादा अडसड,धामणगाव रेल्वे मतदार संघ
संवैधानिक आंदोलनाचे प्रेरणास्थान गमावले
वदर्भाच्या सिंचन अनुशेषाच्या लढ्याला दिशा देणारे आणि ज्ञान, अभ्यास व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेले प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने विदर्भाने एक अभ्यासू मार्गदर्शक, तर समाजाने एक निस्वार्थ ज्ञानयोगी गमावला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान जितके मोलाचे होते, तितकेच विदर्भाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी उभारलेले संवैधानिक आंदोलनही प्रेरणादायी होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न केवळ आकडेवारीत न मांडता त्यांनी तो जनतेच्या विकासाशी जोडला आणि आयुष्यभर अभ्यासपूर्ण, संयमी व लोकशाही मार्गाने त्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांची खोली, समाजाविषयीची तळमळ आणि विदर्भाच्या विकासासाठीची त्यांची अखंड बांधिलकी पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने विदर्भाच्या वैचारिक आणि सामाजिक नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य विद्यार्थ्यांना, सहकार्यांना व अनुयायांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी
विदर्भाच्या विकासातील अनुशेष दूर करण्यासाठी आयुष्यभर झटणारे, अमरावतीचे माजी आमदार, ज्येष्ठ समाजसेवक तसेच लाडके नेते मा. श्री. बी. टी. उर्फ भाऊराव देशमुख यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.प्रा. बी. टी. देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात समाजहित, जनकल्याण आणि सर्वसमावेशक विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. विशेषतः विदर्भातील अनुशेषाच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. विधानमंडळात त्यांनी या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण आणि विवेचक चर्चा घडवून आणत अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले व त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’, राष्ट्रपतींच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’, तसेच ‘दक्ष नागरिक पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले-फतिमा शेख पुरस्कार’, तसेच ‘कार्यक्षम आमदार’ अशा अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले होते.एक संवेदनशील लोकनेता, अभ्यासू विधिमंडळ सदस्य आणि समाजासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून प्रा. बी. टी. देशमुख यांची ओळख कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने विदर्भाने एक खंबीर, प्रामाणिक आणि लढवय्या नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्ञानक्षेत्राची अपरिमित हानी
प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने ज्ञानक्षेत्र, शिक्षण आणि सिंचन अनुशेषाच्या चळवळीला अपरिमित हानी
विदर्भाच्या सिंचन अनुशेषाविरुद्ध सातत्याने संवैधानिक मार्गाने लढा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि खर्या अर्थाने ज्ञानयोगी प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण, सिंचन आणि ज्ञानक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. खर्या अर्थाने ज्ञानयोगी असलेले प्रा. डॉ. बी.द्र. देशमुख यांचे निधन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अपरिमित हानी आहे. सिंचन अनुशेषाच्या लढाईत त्यांच्यासोबत काम करणे ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांचे स्थान माझ्या आयुष्यात गुरुवर्यांप्रमाणे होते. शिक्षकांपासून प्राध्यापक ते विदर्भाच्या सिंचन अनुशेषावर खंबीर भूमिका घेणारे, आणि यासाठी सातत्याने लढा देणारे कुशल नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि ज्ञान संपादनाची अखंड प्रक्रिया म्हणजेच प्रा. बी. टी. देशमुख. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाविरुद्धचा लढा संवैधानिक मार्गाने लढणारे कणखर व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाने वैदर्भीय सिंचन अनुशेषाविरुद्ध लढणारा खरा योद्धा आपल्यातून निघून गेला आहे. शिक्षण, सिंचन आणि राजकीय सूचीतेचे एक पर्व अस्तंगत झाल्याची भावना मनात दाटून येते.
प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून केलेले कार्य समाजाला नवी दिशा देणारे आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या अनुशेषावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आणि संवैधानिक मार्गाने लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे विदर्भाच्या सिंचन अनुशेषाला व्यापक स्वरूपात महाराष्ट्राच्या पटलावर व्याप्ती मिळाली. त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या विकासासाठी खर्या अर्थाने लढा देणार्या एका व्यक्तिमत्त्वाचा आज अस्त झाला आहे. त्यांच्या जाण्याने वैदर्भीय अस्मितेच्या नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढणे केवळ अशक्य आहे.
चालते-बोलते विद्यापीठ गेले
विदर्भाच्या शैक्षणिक, वैचारिक आणि सिंचन चळवळीचे महामेरू, आमच्या अमरावतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. डॉ. बी. टी. देशमुख (बी. टी. सर) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनातील एका ऋषितुल्य, अभ्यासू पर्वाचा अंत झाला आहे.बी. टी. सर हे केवळ एक लोकप्रतिनिधी नव्हते, तर ते विधानपरिषदेचे चालते-बोलते विद्यापीठ होते. सलग 30 वर्षे त्यांनी सभागृहात पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न ज्या आक्रमकतेने आणि अभ्यासूवृत्तीने मांडले, त्याला तोड नाही. विदर्भाच्या हक्काचा ’सिंचन अनुशेष’ किती हजार कोटींचा आहे, हे आकडेवारीसह सभागृहात मांडून सरकारला झुकवणारे ते खर्या अर्थाने विदर्भाचे वाघ होते.अमरावती जिल्ह्यासाठी तर त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे. ’संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ’ आकारास येण्यात आणि स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराची तहान भागवणारी ’अप्पर वर्धा पाणीपुरवठा योजना’ असो की इतर पायाभूत सुविधा, अमरावतीकरांसाठी ते या योजनांचे खरोखर जनक होते. राजकारणात असूनही अत्यंत साधे, निस्पृह आणि तत्त्वनिष्ठ जीवन जगणार्या सरांची जागा कधीही भरून निघणार नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या परिवाराला देवो, हीच प्रार्थना.
डॉ. अनिल बोंडे, खासदार, राज्यसभा तथा माजी कृषिमंत्री




