पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या

शेतकरी चिंतेत

कुर्‍हा /19 जून: जून महिना अर्ध्यावर आला असतानाही अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाची सुरुवात होत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. मात्र यंदा आभाळात ढगांची वर्दळ दिसत असली तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतीचे संपूर्ण गणितच बिघडले आहे.
कुर्‍हा परिसरात शेतकर्‍यांची मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करून ठेवले आहे. काही शेतकर्‍यांनी कर्ज काढून शेतीसाठी आवश्यक खर्चही केला आहे. मात्र पाऊस नसल्याने पेरणी सुरू करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणीसाठी योग्य कालावधी हातातून निघून जात असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी सलग आणि समाधानकारक पाऊस होईपर्यंत पेरणी करणे धोक्याचे ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. एकीकडे वाढलेले कृषी खर्च आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ग्रामीण भागात सध्या सर्वत्र पावसाचीच चर्चा सुरू असून शेतकर्‍यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. पाऊस वेळेत न झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांच्या लागवडीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आगामी काही दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button