अमरावती जिल्ह्यात बुलेटस्वारांवर पोलिसांचा दणका
रस्त्यावरील कर्णकर्कश आवाजावर पोलिसांची कारवाई

दीड लाखांचा दंड वसूल करून कारवाई
अमरावती /19 जून– अमरावती ग्रामीण पोलिसांनी सुधारित सायलेन्सर बसवून कानठळ्या बसवणारा आवाज काढणार्या दुचाकीस्वारांविरुद्ध धडक मोहीम राबवून दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 4 जून ते 18 जून या कालावधीत राबवलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल 150 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि नागरिक, रुग्ण तसेच वृद्ध व्यक्तींची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा, अचलपूर वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. अवैध सायलेन्सर जप्त करत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार आहे. ग्रामीण भागात विशेषतः बुलेट गाड्यांवर अवैध किंवा कट-आउट सायलेन्सर बसवून मोठ्या प्रमाणात आवाज केला जात होता. यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्त तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली. या काळात पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी करून तपासणी केली. कारवाई दरम्यान दोषी चालकांकडून 150 अवैध सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुणीही गाडीचा आवाज वाढवून त्रास देत असल्यास त्याची माहिती तत्काळ 112 या टोल-फ्री क्रमांकावर द्यावी. तसेच हेल्मेटचा वापर, वेगावर नियंत्रण, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेने केले आहे.




