मोझरी पॉइंटवर आढळला कुजलेला मृतदेह
हत्या की आत्महत्या, चर्चेला उधान

-मृतक गळफास लावलेल्या अवस्थेत
चिखलदरा / 23 जून : पर्यटननगरी चिखलदरा येथे मोझरी पॉइंट परिसरात जंगलात एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात असून चर्चेला उधान आले आहे. मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहे.
मोझरी पॉइंट परिसरातील जंगलात एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला काही लोकांच्या नजरेस पडला. याबाबत तात्काळ चिखलदरा पोलिसांना सुचना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन घटनास्थळावरच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले. या व्यक्तीचा मृत्यु दहा-बारा दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने चेहरा ओळखायला येत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच मृतकाची ओळख पटविण्याचे आव्हान चिखलदरा पोलिसांसमोर आहे.
या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली, हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे. सध्या त्याबाबत अंदाज वर्तविले जात आहेत. घटनास्थळी चिखलदराचे ठाणेदार प्रशांत मसराव, हेकॉ अमोल शेंद्रे, शैलेश बेदरकर, अनिल कापरे यांनी भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.




