हेलिकॉप्टरने आले ‘नीट’चे पेपर

सीआरपी एफच्या तुकडीचा बंदोबस्त

अमरावती/15 जून-राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिका सोमवारी विशेष हेलिकॉप्टरने अमरावतीत दाखल झाल्यात. सीआरपीएफच्या तुकडीसह वाहनांच्या ताफ्याद्वारे या प्रश्नपत्रिका कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कोषागार कार्यालय व कॅम्प स्थीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये सीलबंद करण्यात आल्या.
’नीट’ परीक्षेबाबत प्रशासनाने अभूतपूर्व गोपनीयता आणि सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्ह्यात रविवार, 21 जून रोजी 14 केंद्रांवर 4 हजार 770 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोमवारी विशेष हेलिकॉप्टरने शहरात दाखल झाल्या. हनुमान गढी येथील मैदानावर सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तेथून सीआरपीएफच्या तुकडीसह 10 ते 15 वाहनांचा ताफा जिल्हा कोषागारासह स्टेट बँकेडे रवाना झाला. सदरच्या प्रश्नपत्रिका कडेकोट पोलिस बंदोबस्तात एकमेव सुरक्षा कवचात दोन्ही ठिकाणी पोहोचविण्यात आल्या. पेपरफुट उघड झाल्यानंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. नव्याने ही परीक्षा होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) प्रश्नपत्रिकांच्या वाहतूक आणि साठवणुकीसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. देशभरातील तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थी या महत्त्वाच्या परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाकडून यंदा परिक्षेबाबत सुरक्षा आणि कमालिचा गुप्तता राखली जात आहे. कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली. प्रश्नपत्रिकांचे बॉक्स दोन्ही ठिकाणच्या लॉकरमध्ये सुरक्षित सीलबंद ठेवण्यात आले असून, 21 जून रोजी परीक्षा केंद्रांकडे रवाना होण्यापूर्वीच ते बाहेर काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या परीक्षेकडे लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button