जिल्हाधिकार्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते
प्रतिसाद न देण्याचे येरेकर यांचे आवाहन

-पोस्टद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न
अमरावती / 23 जून : अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अकाउंटवरुन विविध प्रकारच्या विनंत्या युजर्सना पाठविण्यात येत आहेत. हा खोडसाळपणा असून या खात्याला कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे बनावट खाते तयार करुन फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलातील मित्राचे फर्निचर विकायचे असल्याची पोस्ट करण्यात आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार असल्याने त्यास प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही पोस्ट किंवा खाते तयार करण्यात आले नसून नागरिकांनी बनावट खात्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये किंवा संपर्क साधू नये. यात नागरिकांची फसवूणक होण्याची शक्यता आहे. असे स्वत: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांच्या नावे फसवणूकीचे संदेश आल्यास स्विकारू नये किंवा ब्लॉक करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.




