पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

पुणे /14 जून : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे, ’नांदी शंभराव्या साहित्यसंमेलानाची’ या उपक्रमाद्वारे पुणे, मुंबई वगळता ज्या ठिकाणी संमेलने झाली नाहीत, अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. दि. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन चार दिवसांचे होणार असून, ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.




