शेतकर्‍यांना तूर्तास कर्जमाफी नाही : कृषिमंत्र्यांचे संकेत

कर्ज भरण्याची केली विनंती

-निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर ढकलला
-शेतकर्‍यांना 5 वर्षात 25 हजार कोटी
अहिल्यानगर/ 22 जून : शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. योग्य वेळ आल्यावर तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवर दिली. तो विषय शेतकर्‍यांचा आहे. मात्र, शेतकर्‍यांनी कर्ज भरलंच पाहिजे असं माझं मत आहे. कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं म्हणत सध्या तरी कर्जमाफी नसल्याचे संकेत कोकाटे यांनी दिलेत.
कोपरगाव येथे नामदेवराव परजणे यांच्या 21 व्या पुण्यस्मरणानिमित्त गौरवपत्र वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतकर्‍यांकडून जर बोगस बियाणे किंवा औषधांच्या साठ्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित कृषी सेवा केंद्रावर तत्काळ कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांच्या फसवणुका सरकार चालू देणार नाही, असा इशाराच माध्यमांशी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बियाणे आणि खत विक्रेत्यांना दिला.
परदेशातील शेतकर्‍यांना जशी त्यांच्या सरकारकडून मदत मिळते. तशीच मदत आपल्याकडील शेतकर्‍यांनाही मिळावी हीच आमची भूमिका आहे. त्यामुळं आता शेतकर्‍यांच्या शेतीमध्ये सरकारच भांडवल घालणार आहे. शेतकर्‍यांना ड्रिप, मल्चिंग पेपर, गोडाऊन इत्यादी शेतीसाठी आवश्यक सुविधा अनुदानाच्या माध्यमातून दिल्या जातील. पुढील पाच वर्षांत सरकार शेतकर्‍यांसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. म्हणजे दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची मदत थेट शेतकर्‍यांपर्यंत अनुदानाच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे, असं यावेळी कोकाटे म्हणाले.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना कोकाटे म्हणाले, इच्छा असणं त्यात वाईट काय आहे? एखाद्या व्यक्तीला राज्याचे नेतृत्व कारायचं असेल तर आकड्यांचा खेळ आहे. या खेळासाठी प्रत्येकाने स्पर्धेत काम करावं. आम्ही आमचं काम करतोय आणि तेही त्यांचं काम करत असल्याचं म्हणत सगळ्यांनाच वाटतं की, आपण मुख्यमंत्री व्हावे, आम्हालाही वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यात चुकीचं काय?

संबंधित बातम्या

Back to top button