वंचितचे निलेश विश्वकर्मा मैदानात उतरले

निवडणूक रिंगणात बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री

अमरावती /1 जून– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तथा चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रियांका विश्वकर्मा उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक आता बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
चांदूर रेल्वे नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या महत्त्वाच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षवर्धन पुंडकर, प्रदेश सचिव राजेंद्र पाथोडे आणि जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचा आपल्या उमेदवाराला मोठा पाठिंबा असल्याचा दावा करत, निवडणुकीत आपण तगडी लढत देऊ, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उमेदवारी अर्ज भरताना नगरसेवक हर्षद वाघ, अरिहंत गेडाम, संजय चोरपगार, प्राजक्ता किल्लेवार, अभय तायडे, बाबाराव गायकवाड, सुरेंद्र खंडारे, रमेश आठवले, सागर भोवते, प्रशांत गजभिये आणि आनंद इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश विश्वकर्मा यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीच्या रिंगणात आता अधिक चुरस निर्माण झाली असून, सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष या जागेकडे लागले आहे. ग्रामीण भागातूनही या उमेदवारीचे स्वागत होत असून, प्रत्यक्ष मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वंचितची अमरावतीत जोरदार राजकीय मुसंडी-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या उमेदवारीमुळे ही लढत आता अधिक रंगतदार झाली असून, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचा कौल कोणाकडे जातो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. वंचितची ताकद वाढल्याने प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button