राज्यात महायुतीचाच विजय होणार

बाजोरीया उमेदवारी मागे घेतील - मंत्री चंद्रशेखर बावनकुळेे

अमरावतीत महायुतीच्या विजयाचा निर्धार पक्का

अमरावतीत महायुतीची एकजूट, प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास

अमरावती /1 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे घोषित केले आहे. महायुतीमधील सर्व 17 जागांवर विजय निश्चित असून स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी राज्यस्तरावर महायुती भक्कम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महायुतीचे सर्व प्रमुख घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या समन्वयातून हा विजय खेचून आणला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोपीकिशन बाजोरिया यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग काढला जाईल आणि ते उमेदवारी मागे घेतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महायुतीमधील सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा करून प्रचाराची रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी पसरवलेली आकडेवारी चुकीची असल्याचे सांगत त्यांनी, अपात्र ठरलेल्या महिलांनी पुन्हा अर्ज करावा, त्यांचे अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले. ज्या महिलांना पात्र ठरवून खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा केले जात आहेत, ती प्रक्रिया पारदर्शक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मंचावर प्रवीण पोटे पाटील, आ. संजय खोडके यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी अनेक नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी-लाडकी बहीण योजनेबाबत पसरवलेली चुकीची माहिती खारीज करत, अपात्र ठरलेल्या गरजू महिलांना पुन्हा संधी दिली जाईल. कागदपत्रांची फेरपडताणी करून एकाही पात्र महिलेला या योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, महिला सक्षमीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button