प्रवीण पोटेंचा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

भाजप व मित्र पक्षांनी दिला भक्कम पाठींबा

नगरसेवकांमध्ये उत्साह, विजयाची खात्री

अमरावती/1 जून- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे महसूल व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोटेंनी दुसरा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. मागील बारा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी मतांनी विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप आणि महायुतीतील दिग्गज नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक रिंगणात तिसर्‍यांदा नशीब आजमावत असलेल्या प्रवीण पोटे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ. सुलभा खोडके, आ. बच्चू कडू उपस्थित होते. याशिवाय माजी खा.आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आशिष धर्माळे व श्याम देशमुख, भाजपचे प्रदेश पदाधिकारी जयंत डेहनकर, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, महिला शहराध्यक्ष सुधा तिवारी, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की शर्मा, मनपा गटनेते चेतन गावंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, नगरसेवक आशिष अतकरे, मनिष बजाज, राधा कुरील व पल्लवी कांडलकर, माजी नगरसेवक तुषार भारतीय, राजेश साहू पठाण व चेतन पवार यांच्यासह श्रेयस पोटे, बंडू पडोळे, नितीन भेटालू, नितीन गुडधे, प्रकाश पुंड व प्रदीप गौरखडे यांची उपस्थिती होती. निवडणूक अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रवीण पोटे म्हणाले की, गेल्या बारा वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी माझे घनिष्ठ संबंध राहिले असून, सातत्याने विकासासाठी काम केले आहे. याच कार्यपद्धतीवर आणि संघटनेवर विश्वास ठेवून पक्षाने मला पुन्हा संधी दिली आहे. महायुतीसाठी ही जागा प्रतिष्ठेची मानली जात असून, माझ्या विकासकामांच्या जोरावर मी मोठ्या फरकाने विजयी होईन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीचे वातावरण अधिक तापले असून, विजयाचा पूर्ण निर्धार त्यांनी केला आहे.
विकासाच्या बळावर विजयाची खात्री-प्रवीण पोटे यांनी बारा वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. लोकप्रतिनिधींशी असलेले सलोख्याचे संबंध आणि पक्ष संघटनेची भक्कम साथ त्यांना विजयासाठी बळ देत आहे. यामुळे विरोधी पक्ष हतबल असून, पोटे यांचा तिसर्‍यांदा विजय निश्चित मानला जात आहे. विकासच या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button