रवी राणांच्या व्युहनितीवर प्रश्नचिन्ह

प्रवीण पोटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने

अमरावती/31 मे– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून बडनेर्‍याचे आ. रवी राणा यांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या होत्या. विशेषतः भाजपचे प्रविण पोटे यांच्या विरोधात रवी राणा यांनी दंड थोपटले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या अधिकृत उमेदवार यादीवरून भाजपची भूमिका स्पष्ट झाली असून, प्रविण पोटे यांना उमेदवारी देऊन भाजपने रवी राणांच्या दबावाला न जुमानता आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माजी खा. नवनीत राणा यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्याऐवजी प्रविण पोटे यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रविण पोटे यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे संकेत दिले होते. तरीही, राणा दाम्पत्याने आपली सर्व ताकद पणाला लावून प्रविण पोटे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जीवापाड प्रयत्न केले होते. मात्र, भाजप नेतृत्वाने ही रणनीती मोडीत काढली असून, भारतीय जनता पक्ष स्वतःची धोरणे आखण्यात स्वतंत्र असून कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला जाणार नाही, असा संदेश या उमेदवारी घोषणेतून स्पष्ट झाला आहे.
रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष महायुतीचा घटक असल्याने, ते महायुतीचा धर्म पाळणार की अमरावती महानगर पालिका निवडणुकी प्रमाणे भाजपच्या अधिकृत उमेदवारा विरुद्ध आपले उमेदवार उभे करणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. जर त्यांनी पुन्हा जुन्याच रणनीतीचा अवलंब केला, तर त्याचा प्रविण पोटे यांच्या विजयावर नेमका काय परिणाम होईल, याचा अंदाज राजकीय गोटात बांधला जात आहे. प्रविण पोटे यांना विजयापासून रोखणे अशक्य असल्याने, त्यांच्या मताधिक्य कमी करण्यासाठी रवी राणा प्रयत्न करू शकतात, असे विश्वासार्ह सूत्रांचे म्हणणे आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रवी राणा यांनी सुरुवातीला भाजपसोबत युती केली होती, मात्र पुढे त्यांनी भाजपच्याच उमेदवारांचा पराभव केला होता. ही बाब स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलीच जिव्हारी लागली होती. याचाच परिपाक म्हणून विधानपरीषदेच्या या निवडणुकीत राणांना किती महत्त्व द्यायचे, यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडली होती, असे समजते. रवी राणा गेल्या 10 दिवसांपासून अमरावतीच्या बाहेर होते. ते चंदीगडला असल्याच्या चर्चा होत्या, तर काही कार्यकर्ते ते परदेश दौर्‍यावर असल्याचे सांगत होते. मात्र, अधिकृत सूत्रांनी ते चंदीगडवरून मुंबईत येत असल्याचे स्पष्ट केले होते. मुंबईत राहून रवी राणांनी या निवडणुकीसाठी नेमकी काय ’फिल्डिंग’ लावली आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, 2 तारखेपासून प्रत्यक्ष रणांगणात काय घडामोडी घडतात याकडे राजकीय निरीक्षकांची नजर लागली आहे.या राजकीय घडामोडींनंतर आ. रवी राणा आता कोणती भूमिका घेतात आणि प्रविण पोटे यांना रोखण्यासाठी त्यांची आगामी रणनीती काय असेल, याकडे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button