उमेदवारी अर्जावरील सुचकसाठी नगरसेवकांकडून 50 हजार ते 1 लाखाची मागणी

अमरावती विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार

काँग्रेसचा बी-फॉर्म हर्षजीत देशमुखांनाच

अमरावती/31 मे- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणार्‍या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला असून, या निवडणुकीत नगरसेवकांच्या स्वाक्षरींसाठी मोठा ’घोडेबाजार’ सुरू झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. उमेदवारी अर्ज भरताना सूचक म्हणून सही करण्यासाठी काही नगरसेवकांकडून तब्बल 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
सध्याच्या राजकीय गणितानुसार, भाजपचे प्रवीण पोटे पाटील आणि काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांना त्यांच्या पक्षांकडे असलेल्या पुरेसा संख्याबळाचा पाठिंबा असल्याने त्यांना इतर नगरसेवकांची गरज भासलेली नाही, परिणामी ते या वादापासून दूर आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार गोपीकिशन बाजोरिया आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्याकडे स्वतःचे पुरेसे नगरसेवक नसल्याने त्यांना इतर पक्षांच्या नगरसेवकांना गळ घालावी लागत आहे. डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आपली मातृभूमिशी बोलतांना असे सांगितले की, आपण परवाच दोन अर्ज भरले असून 20 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्यांना प्रत्यक्ष सुचक नगरसेवकांची नावे विचारली असता त्यांनी त्याबाबत मौन बाळगणेच पसंत केले आहे.दुसरीकडे, महायुतीचे घटक पक्ष असलेले आ. रवी राणा यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने राजकारण अधिक तापले आहे. रवी राणा दोन उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी तब्बल 20 नगरसेवकांची व्यवस्था केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांच्याकडे प्रत्यक्ष एवढे संख्याबळ नसल्याने हे केवळ त्यांचे ’शक्तिप्रदर्शन’ असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे रवी राणा हे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना शेवटी पाठिंबा देणार की स्वतःचे उमेदवार रिंगणात कायम ठेवणार, यावर सध्या राजकीय वर्तुळात मोठे तर्कवितर्क लावले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जुलै ही शेवटची मुदतअसून, आज संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नेत्यांच्या हालचाली आणि पडद्यामागच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button