प्रवीण पोटे यांच्यासाठी भाजपची जोरदार एकजुट

विजयासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार

अमरावती /31 मे– स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील 10 मतदार संघातून 10 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून, त्यामध्ये अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रवीण पोटे यांना तिसर्‍यांदा संधी देत भाजपने त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. पक्षांतर्गत काही चर्चा सुरू असतानाही भाजपने पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज अमरावती दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धामणगाव रेल्वेचे आ.प्रताप अडसड यांच्या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत गडकरी यांनी प्रवीण पोटे यांच्या विजयासाठी कोणताही प्रयत्न कमी पडू देऊ नका, असा सक्त आदेश सर्व पदाधिकार्‍यांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोटे यांच्या विजयासाठी अत्यंत आग्रही असून, त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सर्वतोपरी ताकद पणाला लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अमरावती भाजपमध्ये विविध नेत्यांचे गट असले तरी, मुख्यमंत्री फडणवीसआणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या आदेशामुळे भाजपमध्ये आता एकजूट दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींच्या या कडक भूमिकेमुळे भाजपची तटबंदी कोणीही भेदू शकणार नाही, अशी भक्कम रणनीती आखण्यात आली आहे. बडनेरा मतदार संघाचे आ. रवी राणा यांचा प्रवीण पोटे यांना असलेला विरोध भाजपच्या स्तरावर नगण्य मानला जात असून, त्याकडे फारसे लक्ष न देता पक्ष प्रचारावर लक्ष केंद्रित करत आहे.मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर मतांची फोडाफोड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. हे लक्षात घेऊन, प्रवीण पोटे पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. विदर्भात आपली पकड कायम ठेवण्यासाठी आणि अमरावतीमध्ये पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि नेते या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहत असून, विजयासाठी कोणतीही कसर न सोडता ते कामाला लागले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button