आयुक्त वर्षा लड्डा यांनी केली विविध कामांची पाहणी
अधिकार्यांना दिल्या सूचना

अमरावती/29 मे: अमरावती: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, विविध भागांत सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरण आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवारी सकाळी थेट पाहणी केली. या दौर्यात कामांची पाहणी करून आयुक्तांनी विकासकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अभियंते व कंत्राटदारांना दिले आहेत.
शहरातील मुख्य मार्गांचे काँक्रीटीकरण आणि पेव्हर ब्लॉकची कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने, बियाणी चौक ते इर्विन चौक या मार्गापासून दौर्याची सुरुवात झाली. या मार्गावर पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. त्यानंतर प्रभाग 18 मधील दस्तुरनगर ते छत्री तलाव या मार्गावरील 1000 मीटर लांबीच्या रस्ते विकासाची पाहणी केली. येथे मुख्य काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पेव्हर ब्लॉकची कामे पावसाळ्यापूर्वीच मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभाग 19 मधील मानवी अपार्टमेंट ते अकोली टी-पॉइंट आणि सातुर्णा ते अकोली रेल्वे टी-पॉइंट या मार्गांवरील 65 ते 70 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित 500 मीटरचा भाग तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, रस्ते परिसरात पडून असलेले अनावश्यक बांधकाम साहित्य तात्काळ हटवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील गृहप्रकल्पांची पाहणी करताना, बेनोडा येथील 80 व 97 सदनिकांचा आढावा घेतला. यावेळी 122 लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचा हिस्सा जमा न केल्याने मूलभूत सुविधांची कामे खोळंबल्याचे निदर्शनास आले. या लाभार्थ्यांना 10 जूनपर्यंत रक्कम भरण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. मुदतीत रक्कम न भरल्यास प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पाहणी दौर्यात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, अजय विचोरिया, लक्ष्मण पावडे, सचिन मांडवे, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, शैलेश बोरकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.




