विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनीची उंच भरारी

वैष्णवी चौथे हिने एकाच वेळी चार परीक्षेत यश संपादित करुन रचला इतिहास

अमरावती /25 मे- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रामभाऊ चौथे हिने सरळ सेवा परीक्षेत उज्वल यश संपादन करुन महाविद्यालयाच्या तसेच पर्यायाने विद्यापीठाच्या यशात मानाचा तुरा रोवला. कु. वैष्णवी चौथे हिने एकाच वेळी चार ठिकाणी परीक्षेत यश संपादन करुन एक इतिहास रचला असून त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयात वरीष्ठ लघुलेखक या पदावर रुजू होणे तिने पसंत केले. त्यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, धर्मदाय विभाग, मुंबई आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई या ठिकाणी हायर ग्रेड असल्याने लघुलेखक म्हणून एकाच वेळी तिची चारही ठिकाणी निवड झाली होती. कष्टाला जिद्द, चिकाटी, मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सातत्याची जोड मिळाल्यास नक्कीच यशाला गवसणी घालता येते, हे तिने सिद्ध केले. अतिशय सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राथमिक शिक्षण झेडपी शाळेत झालेले असतानाही कु. वैष्णवी हिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशाबद्दल मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.ए.आर. म्हळसने आणि इतर प्राध्यापकांनी तिचा सत्कार करून तिला याप्रसंगी शुभेच्छा दिल्यात. सोबतच तिच्या यशाची पायाभरणी करणाया आई-वडिलांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. वैष्णवी हिने संपादित केलेल्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.ए.आर. म्हळसने यांनी तिचे अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात. कु. वैष्णवीने तिच्या यशाचे श्रेय आई-वडील, मॉडेल डिग्री कॉलेजचे मार्गदर्शक, प्राध्यापक, महाविद्यालयामध्ये घेतल्या जाणाया स्पर्धा परीक्षेचे शिक्षक यांना दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. भांडक्कर यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button