तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट

आठ बेडची स्वतंत्र व्यवस्था

-तालुक्यातील रुग्णांसाठी सुविधा
तिवसा / 22 जून: तिवसा उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलीसिस रुग्णांसाठी आठ बेडचे स्वतंत्र एक युनिट उभारण्यात आले असून प्रथम डायलीसिस रुग्ण गजानन चरपे (वय 55, रा. रघुनाथपूर) यांच्यावर यशस्वी डायलिसिस प्रक्रिया करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांच्या मार्गदर्शनात डॉ. विकास जायभाये, परिचारिका नम्रता दवाळे, सचिन डोंगरे, शुभम पटेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदेश ताकसांडे यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पाडली. या डायलीसिस सुविधेमुळे शहरासह तालुक्यातील डायलीसिस रुग्णानां मोठी उपलब्धी झाली आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना दर आठवड्याला जिल्ह्याच्या ठिकाणी डायलिसिस प्रक्रिया करण्यासाठी जावे लागते. रुग्णांना खाजगी रुग्णालयात चार हजारापर्यंत खर्च करावा लागत होता. परंतु आता तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू झाल्याने आरोग्य सुविधेमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली असून यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतो आहे. आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने एचएलएल कंपनी व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर स्वतंत्र डायलिसिस युनिट उभारून याठिकाणी आठ नव्या अत्याधुनिक मशीन, आठ बेड तसेच एचआयव्ही, हिपॉटायटीस अशा रक्त संक्रमित रुग्णांसाठी राखीव बेडची सोय केली आहे.
या नव्याने उभारलेल्या डायलिसिस युनिटमध्ये किडनी विकार तज्ञ डॉ. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक परिचारिका, दोन डायलिसिस तंत्रज्ञ व मदतनीस कार्यरत आहे. त्यामुळे या डायलिसिस सुविधेचा रुग्णानी लाभ घ्यावा, असे आवाहन तिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

-ट्रामा केअरची अज्ञापही प्रतिक्षा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विकास आराखड्यातून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाची इमारत व ट्रामा केअर उभारण्यात आले. परंतु येथील ट्रामा केअर अजूनपर्यंत सुरु करण्यात आले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून इमारती उभारून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. याठिकाणी स्वतंत्र महिला-पुरुषांचे वार्ड, प्रयोगशाळा, ओपीडी, महिला प्रस्तुती वार्ड तसेच नव्याने डायलिसिस युनिट सुरु करण्यात आले. त्यामुळे ट्रामा केअर देखील लवकर सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस टीम या युनिटमध्ये कर्तव्य बजावत आहे. डायलिसिस मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी महत्त्वाचा उपचार आहे. सर्व उपचार मोफत असून रुग्णासाठी उपयुक्त ठरणार आहे.
– डॉ. शिवराज माने
वैद्यकीय अधीक्षक तिवसा.

संबंधित बातम्या

Back to top button