स्वीफ्ट डिझायरची दुचाकीला धडक : एकाचा मृत्यू
शहरातील महात्मा फुले महाविद्यालयासमोरील घटना

वरुड /19 मे– शहरातील महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी महाविद्यालयानजीक भरधाव व अनियंत्रीत स्वीफ्ट डिझायर दुचाकीवर आदळुन झालेल्या अपघातात 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (ता.18) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी फरार झालेल्या कार चालकाला अवघ्या एका तासात अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वरुड शहरातील प्रकाश युवनाते हा युवक त्याच्या दुचाकीने मुलताई चौक कडून बसस्थानकाकडे जात असतांना महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी महाविद्यालयाजवळ मागुन भरधाव वेगाने येणार्या एम.एच.27 क्यु 1412 क्रमांकाच्या स्वीफ्ट कारने दुचाकीला जब्बर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक प्रकाश हा काही अंतरवर जावुन सिमेंट रस्त्यावर धडकला. जखमी प्रकाश काही वेळ तिथेच पडून असतांना नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली मात्र प्रकाशला कोणीही रुग्णालयात नेण्याचे स्वारस्य दाखविले नाही. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रकाशला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अपघात घडल्यानंतर स्वीफ्ट कार चालकाने या दुचाकीला घटनास्थळावरुन पळ काढला मात्र अवघ्या 1 तासातच त्याला पोलिसांनी कार सहित ताब्यात घेतले.या प्रकरणी मृतकाचा भाऊ आकाश रामाजी युवनाते (38), रा.गजानन नगर रोड वरुड याचे फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी सिल्व्हर रंगाच्या स्वीफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.27 क्यु 1412 च्या चालकाविरुध्द कलम 106 (1), 281 बी.एन.एस.अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.




