सोशल मीडियावर तलवार फिरवणे युवकाच्या अंगलट

गरुडदृष्टी पथकाची परतवाड्यात कारवाई

व्हायरल व्हिडिओनंतर युवक ताब्यात

परतवाडा/19 मे: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांकडून होणारे शस्त्र प्रदर्शन आता थेट पोलिस कारवाईचे कारण ठरत आहे. तलवार हातात घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे एका युवकाच्या चांगलेच अंगलट आले असून, अमरावती ग्रामीण पोलिसांच्या गरुडदृष्टी उपक्रमांतर्गत संबंधित युवकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अचलपूर-परतवाड्यासह जिल्ह्यात सोशल मीडियावर दहशत निर्माण करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राहुल रामेश्वर झोंबाडे (वय 27, रा. कांडली, परतवाडा) हा युवक मित्राच्या एका कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचताना दिसत होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओमध्ये युवकाकडून तलवारीचे प्रदर्शन करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. दरम्यान, सोशल मीडियावरील संशयास्पद व गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार्‍या अमरावती ग्रामीण पोलिसांच्या गरुडदृष्टी पथकाच्या निदर्शनास हा व्हिडिओ आला. पथकाने तातडीने युवकाची माहिती व पत्ता शोधून काढत परतवाडा पोलिसांच्या मदतीने संबंधित युवकाला कांडली परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर युवकाविरुद्ध अवैधरित्या शस्त्र बाळगणे, सार्वजनिकरीत्या शक्तिप्रदर्शन करणे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवकाची समज देत भविष्यात अशा प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट किंवा व्हायरल करणार नसल्याची खात्री करून घेतली. तसेच यापुढे शस्त्र प्रदर्शनास खतपाणी घालणार नसल्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर तलवारीने केक कापणे, बंदुका दाखवत रील बनवणे, अश्लील भाषा वापरणे, धमकी देणे तसेच लोखंडी रॉड व शस्त्रांचे प्रदर्शन करणे असे प्रकार वाढले आहेत. अशा व्हिडिओंमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने पोलिस प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईनंतर अचलपूर-परतवाड्यासह संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणार्‍या युवकांची भांबेरी उडाल्याची चर्चा आहे. गरुडदृष्टी पथकाकडून सोशल मीडियावरील प्रत्येक संशयास्पद व्हिडिओवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले असून, युवकांनी कायद्याचा भंग करणारे अथवा दहशत निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावरील स्टंट महागात

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी शस्त्रांचे प्रदर्शन करणार्‍या युवकांवर पोलिसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे. गरुडदृष्टी पथक सोशल मीडियावरील संशयास्पद व्हिडिओंवर बारकाईने लक्ष ठेवत असून, दहशत निर्माण करणारे अथवा कायद्याचा भंग करणारे व्हिडिओ पोस्ट करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत. युवकांनी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे।

संबंधित बातम्या

Back to top button