मुलाकडून मुलीला काठीने बेदम मारहाण

व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल

-अकोल्यातील धक्कादायक घटना
-तीन अल्पवयीनांना अटक
अकोला / 18 जून: दुसर्‍यासोबत बोलल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात मुलाने एका मुलीला भर रस्त्यातच काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरातून समोर आली आहे. या प्रकाराची चित्रफित समाज माध्यमातून प्रचंड प्रसारित झाली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. मुलाने पीडित मुलीवर बलात्कार केला असून या प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी यांनी दिली.
अकोला शहर शैक्षणिक हब म्हणून पुढे आले आहे. शहरात अनेक बाहेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातून मुला-मुलींमध्ये मैत्री होते. दोघांच्या मैत्रीत तिसरा आला की नवा वाद निर्माण होतो. असाच एक प्रकार अकोला शहरात घडला आहे. एक मुलगी दुसर्‍या मुलाशी बोलल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने त्या मुलीला काठीने बेदम मारहाण केली. भररस्त्यात मुलीला काठीने बेदम मारहाण झाल्याने खळबळ उडाली. या मारहाणीच्या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर प्रचंड प्रसारित झाली. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मारहाण करणारा मुलगा आणि मारहाण झालेली मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत.
या घटनेची चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा होत आहे. मारहाणीची चित्रफित शहरातील व्हॉट्सप आणि इन्स्टाग्रामवर प्रसारित झाली. मारहाण करणारा मुलगा मुलीला ओळखतो. ‘तू इतर मुलाशी का बोलते, याच कारणावरून मुलाने भर रस्त्यात मुलीला हातातील काठीने मारहाण करत असल्याचे चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. भररस्त्यात मारहाणीचा प्रकार सर्रासपणे सुरू असतांना त्या मुलाला रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, ही चित्रफित समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या आईने मारहाण करणार्‍या मुलाविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुलीवर त्या मुलाने बलात्कार केल्याचे समोर आले असून त्याने अश्लील छायाचित्र देखील समाज माध्यमावर प्रसारित केले आहेत. या प्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी हे तपास करीत आहेत. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसंदर्भात अधिक सतर्क राहण्याची गरज दिसून येते.

संबंधित बातम्या

Back to top button