अरविंद चावरिया अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त
पुणे येथून पदोन्नतीवर बदली

-मुळ जळगावचे रहिवासी
-लवकरच कार्यभार स्विकारणार
अमरावती / 16 मे: महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी अरविंद चावरिया यांची अमरावतीचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद चावरिया हे पुणे येथे शहर पोलिस विभागात अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. तेथून पदोन्नतीद्वारे त्यांची अमरावतीचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याने आज 12 आयपीएस व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात अरविंद चावरिया यांचा समावेश आहे.
आयपीएस नविनचंद्र रेड्डी यांचे दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे स्थानांतरण झाल्याने अमरावतीचे पोलिस आयुक्त पद रिक्त झाले होते. त्यामुळे अमरावतीचे नविन पोलिस आयुक्त कोण? याबाबत अमरावतीकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आज सायंकाळी गृहखात्याने अमरावतीचे पोलिस आयुक्त म्हणून अरविंद चावरिया यांचे नाव जाहिर केले. मुळ जळगावचे रहिवासी असलेले अरविंद चावरिया हे गेल्या 28 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागामध्ये त्यांनी पोलिस खात्यात सेवा दिली आहे. अनेक गुन्हे उघड करण्याचे श्रेय त्यांना आहे.
पोलिस दलात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल अरविंद चावरिया यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देवून महाराष्ट्र सरकारतर्फे गौरविण्यात आले आहे. चावरिया यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. 1990 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यशही मिळविले. एमपीएससीच्या माध्यमातूनच ते पोलिस विभागात अधिकारी म्हणून नोकरीत दाखल झाले. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 वर्षांत पोलिस अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. सध्या ते पुणे शहर पोलिस विभागात अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीद्वारे त्यांना अमरावती पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लवकरच ते आपला कार्यभार स्विकारणार आहेत.
-कौटुंबिक पार्श्वभूमि
अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांचा जन्म जळगावमधील तसेच एकत्र कुटुंबातील. वडिल सहकार खात्यात नोकरीला असल्याने त्यांची नेहमीच बदली होत होती. त्यामुळे अरविंद चावरिया यांचे शिक्षणही नाशिक, जळगाव, औरंगाबाद, पुणे असे विविध शहरांमध्ये झाले. शिक्षण पूर्ण होताच लगेच ते पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाले. 28 वर्ष पोलिस दलात सेवा करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.