अमरावती-अकोट मार्गावर एसटीकडून प्रवाशांची लूट
स्लीपरच्या भाड्याची वसुली प्रवास मात्र भंगार गाडीतून

दर्यापूर /9 मार्च : अमरावती ते अकोट या मार्गावर धावणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शयनयान (स्लीपर) बसमध्ये प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गाडी क्रमांक एमएच 09 ईएम 9744 या बसमध्ये प्रवाशांकडून शयनयान सुविधेचे पूर्ण भाडे उकळले जात असून प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छतेचा अभाव, नादुरुस्त दिवे आणि बंद पडलेले पंखे यामुळे प्रवासी कमालीचे संतप्त झाले असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
अमरावती, दर्यापूर आणि अकोट या 90 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे दोन ते तीन तास खर्च करावे लागतात. साध्या बसचे तिकीट साधारण 125 ते 200 रुपयांपर्यंत असताना, अधिक आराम मिळावा या हेतूने नागरिक जास्तीचे पैसे देऊन शयनयान बसची निवड करतात. मात्र, या बसची अवस्था पाहिल्यास ही निवड चुकीची ठरत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. बसमधील गाद्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून अनेक ठिकाणी बेडवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवासादरम्यान भ्रमणध्वनी भारित करण्यासाठी असलेले उपकरण (चार्जिंग पॉइंट) बंद असून रात्रीच्या वेळी बसमधील दिवेही लागत नसल्याने अंधारात प्रवास करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात पंखे बंद असल्यामुळे प्रवाशांचा जीव कासावीस होत आहे. काही ठिकाणी खिडक्यांचे पडदे फाटलेले असून वातानुकूलन यंत्रणाही धड चालत नाही. बस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांच्या कामाचे नियोजन कोलमडत आहे. तिकिटाचे पूर्ण पैसे देऊनही साध्या गाडीसारखा प्रवास करावा लागत असल्याने महामंडळ प्रवाशांची फसवणूक करत असल्याचा आरोप होत आहे. एसटी प्रशासनाने या मार्गावरील सर्व गाड्यांची कसून तपासणी करून प्रवाशांना दर्जेदार सेवा द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संतापलेल्या नागरिकांनी दिला आहे.
प्रवाशांचा संताप: सुविधा शून्य, भाडे पूर्ण -अमरावती दर्यापूर मार्गावर प्रवास करणार्या नागरिकांनी बसच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खिशाला कात्री लागते, पण प्रवासात सुख मिळत नाही, अशी भावना गावखेड्यातील प्रवासी मांडत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने सुधारणा करावी.




