आज भाजपचा मेळावा; ‘11 सूत्री’ कानमंत्र देणार

पश्चिम विदर्भातील फौजेला मिळणार मंत्र

* बुथ स्तरावर कमळ फुलवण्यासाठी रणनीती

अमरावती / 7 मार्च : स्थानिक डॉ. आर. पोटे पाटील महाविद्यालय परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात येत्या शनिवारी 7 मार्च रोजी भाजपच्या पश्चिम विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा मोठा बार उडणार आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत चालणार्‍या या जंगी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते कार्यकर्त्यांना विजयाचा ’11 सूत्री’ गुरुमंत्र देणार असून, बुथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी नवी दिशा देणार आहेत. अमरावतीच्या मातीत आता राजकीय वारे जोरात वाहू लागले असून भाजप आपली फळी अधिक मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. या विभागीय शिबिरासाठी विभागातील सर्व शहरं आणि जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकार्‍यांसह गाव-खेड्यातील मंडल स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे, या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम भरणार आहेत. त्यांच्यासोबतच राज्याचे वजनदार नेते तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनुभवी आमदार संजय कुटे आणि प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या भव्य शिबिरात शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर आणि रविराज देशमुख यांच्यासह विभागातील सर्व शहर आणि ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित राहून कामाचा आढावा घेतील. मंडल स्तरावर आतापर्यंत नक्की काय काय कामं झाली, याचा पाढा या शिबिरात वाचला जाणार असून, कार्यकर्त्यांना ’11 सूत्री’ कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले जाणार आहेत. गावखेड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पक्षाचे विचार कसे पोहोचवायचे आणि बुथ स्तरावर पक्षाची पकड कशी घट्ट करायची, याचे थेट मार्गदर्शन नेत्यांकडून मिळणार आहे. एकूणच, येणार्‍या निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांची ही मोठी तालीम असून, संपूर्ण विदर्भाचे लक्ष या शिबिराकडे लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button