नागपूरच्या माया इवनाते बनणार खासदार
राज्यसभेसाठी भाजपच्या 4 शिलेदारांची नावे जाहीर

* विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते यांना उमेदवारी
* अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
* नव्या चेहर्यांना संधी, धक्कातंत्रासह सोशल इंजिनिअरिंगवर भर
मुंबई/4 मार्च – राज्यसभेसाठी भाजपने आज उमेदवार यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवारांची नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. नागपूरच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि आदिवासी समाजाचा चेहरा असलेल्या माया ईवनाते यांची उमेदवारी सर्वात धक्कादायक मानली जात आहे. विदर्भातून नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा असताना, भाजपने ईवनाते यांना संधी देऊन आदिवासी कार्ड खेळले आहे. मायाताई चिंतामण इवनाते या नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. त्यांनी 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत नागपूर महानगरपालिकामध्ये महापौर पद भूषवले आहे. त्या अनेक वर्षांपासून नागपूर शहर भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्या आदिवासी समाजातून येतात. तसेच त्यांना विविध पदांचा अनुभव आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग च्या सदस्य राहिलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नागपूर महानगरपालिका भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपात पक्ष प्रवेश केला. रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीमुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद रामराव वडकुते यांनी भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले.विनोद तावडे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच मराठी भाषा (भाषा) आणि संस्कृती खात्याचे मंत्रिपदही भूषविले आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली. सध्या ते भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि 12 व्या आणि 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या समन्वय समितीचेही ते प्रमुख सदस्य होते. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा संघटनात्मक कामातून मुख्य प्रवाहात आलेत.



