अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

* श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर
अमरावती /4 मार्च : शहरातील महत्वाचे असलेले अंबादेवी आणि एकविरादेवी संस्थानचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही संस्थानच्या विकासासाठी एकत्रित आराखडा राबवावा लागणार आहे. यासाठी सर्व जमिनीवरील नियोजन करून एकत्रित स्वरूपात कामांचे नियोजन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री रूख्मिणी विदर्भपीठ कौंडण्यपूर आणि अंबादेवी, एकविरादेवी संस्थानच्या विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी येरेकर यांनी, अंबादेवी आणि एकविरादेवी ही शहराच्या मध्य वस्तीत असून जुन्या वस्तीमध्ये आहेत. भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या ठिकाणी सुविधा उभारणे आवश्यक आहे. प्रामुख्याने मंदिराजवळ अस लेले अरूंद रस्ते मोठे करणे गरजेचे आहे. तसेच भाविकांसाठी वाहनतळाची सुविधा उभारावी लागणार आहे. या मंदिरांमध्ये नवरात्री उत्सवाच्या कालावधीत गर्दी होते. गर्दीच्या वेळी सुविधा वाढविणे गरजेचे असते, यावर विश्वस्त मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. विकास आराखडा राबविताना टप्पेनिहाय राबवावा. यासोबतच विकासकामे करताना बांधकाम क्षेत्र वाढविण्याची शक्यता असल्यास महिला बचतगटांना विविध मालाच्या उत्पादनासाठी इमारत देण्यात यावी. कौंडण्यपूर येथे तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासासाठी निधी देण्यात आला आहे. यातून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. संस्थानकडून कौशल्य विकास, तसेच इतर उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून गरजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी इमारत बांधकाम आणि इतर सोयी सुविधांसाठी निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्यानुषंगाने आवश्यक जमिन हस्तांतरणासाठी संस्थानने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी येरेकर यांनी केले.




