अखेर विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली
विमान अपघातानंतर तीन दिवसांनी समोर आली माहिती

*आत्तापर्यंत 32 जणांचे डीएनए जुळले
*14 पार्थिव दिले कुटुंबीयांच्या ताब्यात
अहमदाबाद/15 जून– अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा 12 जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात 242 पैकी 241 प्रवासी आणि क्रू मेंबर या सगळ्यांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही बसले होते. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ही ओळख आता डीएनए चाचणीमुळे पटली आहे अशी माहिती समोर आली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने 11 वाजून 10 मिनिटांनी दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलं. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 32 जणांचे डीएनए जुळले आहेत. तर 14 कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचं पार्थिव दिलं आहे. अनेक मृतदेह भीषण जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डीएनए चाचणी करुनच ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहेत असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.