बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला प्रारंभ

आज रंगमंचावर 6 बालनाट्ये

* कलावंत व कलाकार यांना नाट्यगृहामध्ये सर्व सोयी उपलब्ध करून देणार-महापौर तेजवानी

अमरावती /26 फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिककार्य संचालनाल याच्या माध्यमातून मराठी बाल नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी ला गुरुवार दि. 26 फेब्रुवारी अमरावती मध्ये अतिशय सुंदर उद्घाटन समारंभाने सुरुवात झाली.
सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नाट्य स्पर्धेची ही अंतिम फेरी सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांच्या देखरेखीत आज पासून सुरु झाली असून सांस्कृतिक संचालनालयाचे अधीक्षक वसंतराव खडसे आज स्वतः उपस्थित होते.
अमरावतीचे लोक प्रतिनिधी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीतजी राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलासराव इंगोले आदी मान्यवरांनी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या स्पर्धकांचे स्वागत फलक लाऊन आणि शुभेच्छा देऊन केलेले होते. स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे, नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे नियामक मंडळ सदस्य प्रशांतजी देशपांडे, महापौर श्रीचंद तेजवानी, सभागृह नेता चेतन गावंडे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले परीक्षक सर्वश्री गोविंद गोडबोले, संजय पाटील, श्याम शिंदे, सुरेश गांगुर्डे आणि श्रीमती जुई बर्वे आदी मान्यवर या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित होते. अमरावती नाट्य परिषदेचे सक्रीय सभासद व पदाधिकारी प्रशांतजी देशपांडे, प्रा. डॉ. संजय तिरथकर आणि डॉ. मधुरा कहाळे यांचा नुकताच महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश झाल्याबद्दल माननीय अतिथींनी त्यांचे स्वागत केले आणि सभागृह नेता चेतन गावंडे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अमरावतीचे याच कार्यक्रमात जाहीर आजीवन सदस्यत्व स्वीकारले. नटराज्याची सुंदर मिरवणूक संजना शिरभाते आणि सौ. रोहिणी डोरले यांच्या बाल गोपाल चमूने रंगमंचापर्यंत आणली व अतिथींचे रंगमंचावर आगमन झाले. महाराष्ट्र गीत, शिवतांडव व नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर महापौर श्रीचंद तेजवानी यांनी उद्घाटनाची घोषणा केली. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक अ‍ॅड. प्रशांतजी देशपांडे यांनी केले आणि अध्यक्षीय मनोगत सभागृह नेता चेतन गावंडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व अमरावती शहरामध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्रातील स्पर्धकांचे स्वागत अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी केले. सकाळी 11.00 वाजल्यापासून अहिल्या नगर संघाचे मुंग्यांची दुनिया, अमरावती संघाचे आदिबांच्या बेटावर, नंदुरबार संघाचे स्वराची कहाणी, अभिज्ञान अकादमीचे दिव्याखाली दौलत, कोल्हापूर संघाचे ठोंब्या आणि आकार सोशल फाउंडेशनचे होत्या काही चिमण्या हे 6 बालनाट्य प्रेक्षकांच्या लक्षणीय उपस्थितीत आज सादर करण्यात आले. शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून कोल्हापूर, परभणी, सांगली, अचलपूर इत्यादी संघाचे 6 बालनाट्य सादर केले जाणार आहेत. ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र शासनाचे वतीने रसिक प्रेक्षकांकरिता निशुल्क ठेवण्यात आलेली आहे. अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित राहावे असे आव्हान नाट्य परिषदेचे स्पर्धा समन्वयक श्री. विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे आणि अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button