2365 कंट्रोल युनिट, 4759 बॅलेट युनिट राजस्थानला रवाना

जि.प.निवडणुका लांबणीवर पडल्याने मोठा निर्णय

* संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातून यंत्रांचा ताफा मार्गस्थ

अमरावती /26 फेब्रुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यामुळे लांबणीवर पडल्याने, अमरावती जिल्ह्यात पडून असलेला ईव्हीएम मशीनचा साठा आता राजस्थानमधील निवडणुकांसाठी पाठवण्यात आला आहे. कडक सुरक्षेमध्ये बुधवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातून 2365 कंट्रोल युनिट आणि 4759 बॅलेट युनिट राजस्थानमधील तीन जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आले. यामध्ये 2365 कंट्रोल युनिट भिलवाडा येथे, तर 1400 बॅलेट युनिट अजमेर आणि 3365 बॅलेट युनिट उदयपूरला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा यंत्रांचा साठा मध्य प्रदेशातून मागवण्यात आला होता. अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये याच यंत्रांचा वापरही झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण मर्यादेच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित झाल्या आहेत. परिणामी, ही यंत्रे धूळ खात पडू नयेत आणि राजस्थानमधील जिल्हा परिषद निवडणुका पार पाडता याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा साठा तिथे वळवण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार दिवसांपासून राजस्थान प्रशासनाचे एक विशेष पथक ही यंत्रे ताब्यात घेण्यासाठी अमरावतीत तळ ठोकून होते. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतून ही यंत्रे गोळा करून ती संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील ’स्ट्राँग रूम’मध्ये जमा करण्यात आली होती. बुधवारी पोलीस बंदोबस्तात ही सर्व यंत्रे ट्रकमधून राजस्थानकडे रवाना झाली. जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, जेव्हा अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील, तेव्हा निवडणूक आयोगाकडून पुन्हा नवीन आणि अद्ययावत यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

निवडणूक यंत्रांचे वितरण

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यासाठी 2365 कंट्रोल युनिट, अजमेरसाठी 1400 बॅलेट युनिट आणि उदयपूरसाठी 3365 बॅलेट युनिट असे एकूण मोठे संच पाठवण्यात आले आहेत. आरक्षणाच्या पेचामुळे अमरावतीची निवडणूक लांबल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, राजस्थानचे पथक चार दिवस या प्रक्रियेसाठी शहरात मुक्कामी होते.

संबंधित बातम्या

Back to top button