सराफा व्यापार्याला लुटणार्या टोळीचा ‘गेम ओव्हर’
खाकीचा दणका : 48 तासांत सात दरोडेखोर जेरबंद

* 1 कोटी 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
* पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद; दरोड्याचा थरार उलगडला ?
अमरावती /15 फेब्रुवारी : शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमित्रा ज्वेलर्सचे मालक सुशांत शेरेकर यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्या धाडसी दरोड्याचा अमरावती शहर गुन्हे शाखेने केवळ 48 तासांत छडा लावून सात अट्टल दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 12 लाख 32 हजार रुपयांचा प्रचंड मुद्देमाल हस्तगत केला असून, रविवारी सायंकाळी पोलीस विभागाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी या थरारक मोहिमेचा उलगडा केला. 13 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजता सुशांत शेरेकर आपले दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना, पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मुद्दाम जोराची धडक दिली. शेरेकर रस्त्यावर कोसळताच गाडीतून तीन अनोळखी इसम बाहेर आले, त्यापैकी एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुचाकीची चावी हिसकावून डिक्कीत ठेवलेले 700 ग्रॅम सोने व 1 लाख 70 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेने संपूर्ण सराफा बाजारात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तपासासाठी गुन्हे शाखेची 4 विशेष पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाची सुई नांदगाव पेठ येथील महाराज उपाहारगृहाकडे वळली, जिथे पोलिसांनी वेढा घालून अत्यंत शिताफीने सातही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींमध्ये टोळीचा प्रमुख सैयद इम्रान सैयद मिर उर्फ दबंग (32, रा. लालखडी), फिरोज खान कासम खान (32, रा. विस्मील्ला नगर), शोएब खान अमीन खान (21, रा. रहमत नगर), शेख इम्रान उर्फ इम्मु शेख रहेमान (33, रा. हबीब नगर), शेख रिज्ञावान उर्फ कालु अब्दुल रहेमान खान (19, रा. हैदरपुरा), शुभम उर्फ बंटी ज्ञानेश्वर खंडारे (33, रा. कठोरा बु.) आणि सूरज सिद्धार्थ तायडे (35, रा. बोरगाव धर्माळे) यांचा समावेश आहे. या आरोपींनी अन्य काही ठिकाणीही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
या यशस्वी पत्रकार परिषदेला उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे आणि कैलास पुंडकर हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही मोठी कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पो.नि. मनीष वाकोडे, महेश इंगोले, इम्रान नाईकवाडे, पोउपनि गजानन सोनुने, पोलीस अंमलदार सुनील लासुरकर, सतीश देशमुख, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, झहीर शेख, सचिन बहाळे, झहीरूद्दीन शेख, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभू, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सैयद, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, रंजीत गावंडे, राजीक रायलीवाले, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, संदीप खंडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा, राहुल दुधे तसेच गाडगे नगरचे प्रभारी अधिकारी अतुल वर, सायबर सेलचे पो.नि. अंभोरे, अनिकेत कासार, प्रियंका कोटावार, चेतन गुल्हाने, अश्विन यादव आणि सुषमा आठवले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
नियोजनबद्ध गुन्ह्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश
सराफा व्यापार्याची रेकी करून अत्यंत चलाखीने हा दरोडा टाकण्यात आला होता. मात्र, अमरावती गुन्हे शाखेने तांत्रिक कौशल्याचा वापर करून 48 तासांत 1.12 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.




