अभूतपूर्व तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन

श्री संत गाडगे बाबा समाधी मंदिरात 150 व्या जयंतीनिमित्त

महाकुंभात दातृत्वासोबतच विचारांचा जागर

अमरावती /11 फेब्रुवारी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गाडगे बाबा समाधी मंदिरात यंदा बाबांच्या 150 व्या जयंती महोत्सवाचा आणि महाशिवरात्री उत्सवाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे. 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या या तीन दिवसीय सोहळ्यात भव्य महिला भजन संमेलन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, सेवा आणि दातृत्वाच्या या महोत्सवात हजारो भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात 14 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मूर्ती पूजनाने होईल. त्यानंतर सकाळी 11 ते 5 या वेळेत महिलांच्या सुश्राव्य भजन संमेलनाने अवघी अमरावती दुमदुमून जाईल. या संमेलनाच्या माहितीसाठी भाविकांनी भरत महाराज रेडे, ह.भ.प. बोदळे महाराज किंवा प्रकाश महात्मे यांच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी दुपारी 12 वाजता ज्ञानेश्वर सौदागरे यांच्या हस्ते गरजू, अंध आणि वृद्धांना अन्नदान करण्यात येईल. 15 फेब्रुवारीला ह.भ.प. बोदळे महाराज यांच्या कीर्तनाने जन्मोत्सव साजरा होईल, तर 16 फेब्रुवारीला ह.भ.प. वैशालीताई पाटील यांच्या उपस्थितीत भजनी मंडळांचा गौरव आणि अजय रामचंद्रजी पुंड यांच्याकडून पुरणपोळीच्या महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सामुदायिक प्रार्थनेने दररोज संध्याकाळी या महोत्सवाची सांगता होईल.
सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम-श्री संत गाडगे बाबांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित हे महिला भजन संमेलन महिला शक्तीचा गौरव करणारे ठरेल. भजनांसोबतच अंध, अपंग आणि निराश्रितांना अन्नदान करून बाबांच्या ’जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या संदेशाचा प्रत्यक्ष प्रत्यय या तीन दिवसांत भाविकांना येणार असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button