अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत अमरावती विद्यापीठ अव्वल

कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

* पुरुष स्पर्धेचा थाटात समारोप

अमरावती /6 जानेवारी : अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या घरच्या मैदानावर पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपदाचा मान मिळवला आहे. देशभरातील नामांकित विद्यापीठांना कडवी झुंज देत अमरावतीच्या लेकरांनी मैदानावर आपला जोर दाखवून दिला आणि सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. या दिमाखदार विजयामुळे विदर्भाच्या क्रीडा वैभवात मोठी भर पडली असून यजमान विद्यापीठाने केवळ खेळाचेच नव्हे तर उत्तम नियोजनाचेही मैदान मारले आहे.
या स्पर्धेत राजस्थानच्या माधव विद्यापीठाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने त्यांना रौप्य पदक मिळाले. केरळच्या कालिकत विद्यापीठाने आणि भरतपूरच्या महाराजा सुरजामल ब्रिज विद्यापीठाने संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावून कांस्य पदकाची कमाई केली. बक्षीस वितरण सोहळ्यात कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, अमरावती विद्यापीठाची शिस्तबद्ध यजमान म्हणून संपूर्ण देशात एक वेगळी ओळख आहे. त्यांनी जागतिक स्पर्धेसाठी या स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकाच्या खेळाडूंचा विचार व्हावा अशी आशाही व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन दिले. खेळाडूंनी केवळ जिंकण्यासाठी न खेळता आपल्या खेळाची छाप निवड समितीवर पाडावी, असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. मैदानावर अमरावतीच्या ऋतिक पुडवे याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले, तर रोहित सहारे आणि रोहन पोटे यांनीही आपल्या चपळाईने अमरावतीचे नाव उंचावले. भरतपूर आणि कालिकतच्या प्रशिक्षकांनी विद्यापीठाच्या पाहुणचाराचे भरभरून कौतुक केले. या भव्य आयोजनासाठी डॉ. तनुजा राऊत, डॉ. रुपाली इंगोले आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या चमूने दिवसरात्र मेहनत घेतली. वैयक्तिक यशाची सोनेरी मोहोर स्पर्धेत अमरावतीचा कर्णधार ऋतिक पुडवे हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला. रोहित सहारेने सर्वोत्तम झेल घेणारा तर रोहन पोटेने मधल्या फळीतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पुरस्कार मिळवला. जितेंद्र आणि अभिषेक यांनी कालिकतसाठी, तर सोनू गुजर आणि जयपाल यांनी भरतपूरसाठी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

संबंधित बातम्या

Back to top button