अंबापेठ गौरक्षणच्या विकासाचा बांबल पॅटर्न राबविणार

नवनिर्वाचित नगरसेवक मिलींद बांबल यांची संकल्पना

* स्वच्छता, सुरक्षा व प्रलंबित विकासकामांना अग्रक्रम

अमरावती / 4 फेब्रुवारी – अमरावती महानगरपालिकेत पती आणि पत्नीने आलटून-पालटून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा दुर्मिळ विक्रम प्रस्थापित करणारे भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंद बांबल आता अंबापेठ-गौरक्षण प्रभाग 13 च्या कायापालटासाठी सज्ज झाले आहेत. प्रभाग विकासाचा ध्यास घेतलेल्या बांबल यांनी प्रामुख्याने स्वच्छता, सुरक्षा आणि प्रलंबित विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
रहिवासी आणि व्यापारी संकुलांचे मिश्रण असलेल्या या भागात दैनंदिन स्वच्छतेचे काटेकोर वेळापत्रक लागू करण्यात येणार असून, नागरिकांना थेट आरोग्य निरीक्षक आणि पर्यवेक्षकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले जातील. यामुळे कचर्‍याच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण होण्यास मदत होईल. प्रख्यात अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरांमुळे या परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते, हे लक्षात घेऊन येथे चोवीस तास स्वच्छता आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विणण्याचा त्यांचा मानस आहे. पन्नालाल नगर येथील नाल्याची संरक्षक भिंत उभारण्याला त्यांनी विशेष प्राधान्य दिले असून, शासनाकडून पुरेसा निधी खेचून आणून प्रभागातील सर्व नागरी सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. स्वाती कुलकर्णी आणि लवीना हर्षे यांच्या सोबतीने बांबल हा विकास रथ पुढे नेणार आहेत.
एकवटलेले बांबल कुटुंब: समाजसेवेचा आदर्श-मिलिंद बांबल यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर कौटुंबिक जीवनातही एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श जपला आहे. नितीन आणि दीपक या दोन भावांसह त्यांचे संयुक्त कुटुंब आजही एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहते. आईच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे बांबल कुटुंब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, शेतकरी हिताच्या योजना पोहोचवण्यासाठीही ते सदैव अग्रेसर असतात.

संबंधित बातम्या

Back to top button