हज यात्रेला जाणार्या 615 भाविकांची होणार मोफत आरोग्य तपासणी
जिल्हा हज समिती व इर्विन रुग्णालयाचा उपक्रम

* खादिम उल हुज्जाज समितीने घेतला पुढाकार
अमरावती / 28 जानेवारी – जिल्हा हज समिती आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील 615 निवडक भाविकांचा पवित्र प्रवास सुकर करण्यासाठी 31 जानेवारी रोजी एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वलगाव मार्गावरील ताज मंगल कार्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ही मोफत सेवा उपलब्ध असेल. यंदा जिल्ह्यातील 2 हजार अर्जांमधून 615 भाग्यवान यात्रेकरूंची निवड करण्यात आली असून, त्यांच्या पारपत्र (पासपोर्ट) प्रक्रियेपासून ते तांत्रिक अर्जांपर्यंतची सर्व कामे ’खादिम उल हुज्जाज’ समितीने विनामूल्य पूर्ण केली आहेत. प्रवासादरम्यान यात्रेकरूंना कोणत्याही शारीरिक अडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या थेट देखरेखीखाली हे विशेष लसीकरण पार पडणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून निरपेक्ष भावनेने सेवा देणार्या या समितीने प्रवाशांच्या सोयीसाठी व्यापक नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीने नियुक्त केलेल्या तीन तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत भाविकांना प्रवासाचे शास्त्रशुद्ध धडे दिले जात आहेत. हे प्रशिक्षण साबनपुरा येथील जामा मशीद आणि इतवारा बाजार मशीद अशा केंद्रांवर तीन टप्प्यांत पार पडत आहे. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून निवास आणि भोजनाची सोयही विनामूल्य आहे. मौलाना मेहमूद खान, मौलाना अब्दुल कदीर नदवी, मौलाना युनूस खान आणि मुफ्ती फिरोज खान हे तज्ज्ञ भाविकांना धार्मिक विधींचे मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात चलचित्र फितीद्वारे विमान प्रवास, सामानाचे व्यवस्थापन आणि परकीय देशांतील नियमांची इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत हाजी सलीम टिम्बर, डॉ. मोहम्मद फहीम किदवाई, हाजी शकील मरकज, मोहम्मद अनीस, जफर इकबाल, जाहेद भाई, मिर्झा आसिफ बेग, सलमान खान, राजिक हुसैन सर, मजहर अली, नजीर खान बी.के., एजाज सर आणि हाजी शकील या पदाधिकार्यांचा सक्रिय सहभाग आहे.




