उन्हाळ्यात काचेचा स्कायवॉक खुला होणार

देशातील पहिला प्रकल्प चिखलदर्‍याच्या नंदनवनात

* दरीच्या उरातून निसर्ग न्याहाळण्याची पर्यटकांना सुवर्णसंधी

अमरावती /20 जानेवारी : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदर्‍यात जगातील सर्वात लांब आणि देशातील पहिला 407 मीटरचा काचेचा स्कायवॉक येत्या मे 2026 पर्यंत पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. सुमारे 1500 फूट उंचीवर उभ्या असलेल्या या वास्तूच्या 80 मीटर पारदर्शक काचेवरून 500 पर्यटकांना एकाच वेळी खोल दरीचा अंगावर शहारे आणणारा थरार अनुभवता येईल. तांत्रिक चाचण्या आणि वनविभागाच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे काहीसा विलंब झाला असला तरी आता सिडकोने बांधकामाचा वेग वाढवला असून मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हा जागतिक दर्जाचा निसर्गानुभव पर्यटकांसाठी खुला होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अमरावती जिल्ह्याचा अभिमान असलेल्या या प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मध्यंतरी गुजरात येथील दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव या पुलाच्या बांधकामात अधिक कडक मानके लागू करण्यात आली. रूडकी येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पवन बोगद्याची महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पार पडली असून त्याबाबतचा सकारात्मक अहवाल सिडकोला प्राप्त झाला आहे. या स्कायवॉकचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरीच्या अगदी मध्यभागी असलेला 80 मीटरचा काचेचा मार्ग जिथून खाली पाहताना पर्यटकांना निसर्गाचे एक वेगळेच रौद्र आणि देखणे रूप दिसेल. सिडकोचे कार्यकारी अभियंता अक्षय महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बांधकाम वेगाने पूर्णत्वाकडे जात असून केंद्रीय वनविभागाची अंतिम परवानगी मिळताच हा प्रकल्प लोकांसाठी खुला होईल. यामुळे विदर्भातील पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणार असून पर्यटकांना जागतिक स्तरावरील रोमांचक सुविधा चिखलदर्‍यातच उपलब्ध होणार आहे.
सुरक्षेचा कस आणि तांत्रिक मजबुती- प्रकल्पाची सुरक्षितता तपासण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. सुमारे चार महिने चाललेल्या विविध चाचण्या आणि वार्‍याच्या वेगाचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कामाला वेग देण्यात आला. अक्षय महाले यांच्या देखरेखीखाली अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण होत असून केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळताच पर्यटकांना या उन्हाळ्यात निसर्गाच्या कुशीत प्रत्यक्ष काचेवर चालण्याचा आनंद घेता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button