रा.से.यो निवासी शिबिराचे उद्घाटन
वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय बोडना येथे

अमरावती /13 जानेवारी : श्रम साफल्य फाउंडेशन द्वारा संचालित सौ. वसुधाताई देशमुख महाविद्यालय बोडणा च्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन आज विधिवत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सदर शिबिराचा कालावधी 11 जानेवारी ते 17 जानेवारी असा असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव, नेतृत्वगुण व जबाबदार नागरिकत्व विकसित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन समारंभास गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, एफ.पी.ओ. अध्यक्ष, गावातील मान्यवर ग्रामस्थ, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हारअर्पण आणि पुष्प पूजन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत समाजाशी नाळ जोडणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रस्ताविकाद्वारे सहा.प्रा. स्वाती देशमुख (कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांच्याद्वारे शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य व स्वच्छता जनजागृती, मतदान जनजागृती, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, ग्रामसर्वेक्षण व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले. या उपक्रमांमुळे गावाच्या सामाजिक व पर्यावरणीय विकासास मोलाची मदत होणार आहे.एन.एस.एस. प्रमुखांनी शिबिराच्या उद्दिष्टांची, नियोजित उपक्रमांची व अपेक्षित सामाजिक परिणामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. वर्षाताई सवाई आशा वर्कर , रूपालीताई चौधरी कोषाध्यक्ष, समता ताई घोगरे ग्रामसंघ लेखापाल, अर्चनाताई धावणे सीआरपी, साधना अगम अध्यक्ष, शीला जवंजाळ सचिव, करून बिल्डिंग अंगणवाडी सेविका, सविता आठवले तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असून त्यांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराचे आयोजन यशस्वी झाले.




