मनपा निवडणुकीच्या मैदानात राणेंचा बाण सुटणार

महापालिका विजयासाठी भाजपची सर्वस्व शक्ती पणाला

* दोन वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून शहरात होणार धडाकेबाज प्रचार

अमरावती /9 जानेवारी : भारतीय जनता पक्षाने अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणांगणात आपली पूर्ण ताकद झोकून दिली असून, पक्षाचे स्टार प्रचारक आणि आक्रमक नेते नितेश राणे यांचा 12 किंवा 13 जानेवारी रोजी अमरावती दौरा निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड-शो आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण दौर्‍यांनंतर, आता नितेश राणे यांच्या एकाच दिवशी दोन जाहीर सभांचे आयोजन करून शहरात प्रचाराचा धुरळा उडवण्याचे नियोजन भाजपने केले आहे. गाडगे नगर भागातील गाडगेबाबा समाधी समोरील मैदान आणि ऐतिहासिक दसरा मैदान या दोन ठिकाणी या विराट सभा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
या निवडणुकीत भाजपने आपले सर्व दिग्गज नेते मैदानात उतरवले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आतापर्यंत 4 ते 5 वेळा अमरावतीचा दौरा करून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासोबतच संवादात्मक बैठका आणि जनसभांना संबोधित केले आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या तडाखेबंद भाषणांसाठी ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांच्या दौर्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, राणे यांच्या सभांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा हा मोठा डाव मानला जात आहे. भाजपच्या या ’फायर ब्रँड’ नेतृत्वाच्या आगमनामुळे अमरावती महापालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
नितेश राणे यांच्या सभांचे संभाव्य स्थळ-भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नितेश राणे यांच्या तोफा गाडगे नगर परिसरातील गाडगेबाबा समाधी मंदिर समोरील मैदान आणि दसरा मैदान येथे धडकण्याची शक्यता आहे. एकाच दिवशी या दोन महत्त्वाच्या ठिकाणी जनसभा घेऊन भाजप शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button