मनपा सार्वत्रिक निवडणूक; ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

अधिकारी-कर्मचार्‍यांना महत्वाच्या सूचना

अमरावती /8 जानेवारी : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विविध टप्प्यांवर काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवार, दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता अमरावती महानगर पालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 7 येथील सुरक्षा कक्षांमध्ये ई.व्ही.एम. (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) मधील बॅलेट युनिट (इण) व कंट्रोल युनिट (उण) यांची सिलींग प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व झोनना भेटी दिल्या. त्यांनी प्रत्येक झोनमधील सुरक्षा कक्षांमध्ये सुरू असलेल्या सिलींग प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली. सदर सिलींग प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व नियोजित पद्धतीने पार पडत असून, यामध्ये अधिकृत निवडणूक कर्मचारी, संबंधित अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सुरक्षादलाचे कर्मचारी उपस्थित होते. ई.व्ही.एम. सुरक्षिततेस विशेष प्राधान्य देण्यात येत असून, प्रत्येक यंत्राची नोंद, तपासणी व सीलबंद प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्यात येत आहे.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून, तिच्यात पारदर्शकता व विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. तसेच सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पुढील टप्प्यातील सर्व निवडणूकविषयक कामकाज निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेळेत व सुरळीतपणे पार पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेच्या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन प्रत्येक टप्प्यावर करण्यात यावे व कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ई.व्ही.एम. मधील बॅलेट युनिट (इण) व कंट्रोल युनिट (उण) सिलींग प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात यावी. प्रत्येक ई.व्ही.एम. बाबतची नोंद, सीलबंद क्रमांक, वेळ व उपस्थितांची माहिती अचूकपणे दस्तऐवजीकरण करण्यात यावी. सुरक्षा कक्षांमध्ये सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे व कोणालाही अनधिकृत प्रवेश दिला जाऊ नये. प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व निरीक्षकांना आवश्यक ती माहिती व सहकार्य देण्यात यावे, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारी, तटस्थता व शिस्त पाळून काम करावे तसेच कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडेल याची खात्री करण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करावे. या सूचनांद्वारे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता अबाधित राखण्यावर विशेष भर दिला.

संबंधित बातम्या

Back to top button