दुकानाचे शटर तोडून 5 लाखांची रोकड लंपास
पटवीपुर्यात चोरीची घटना

अमरावती 14 मे: महापालिकेत पशुधन निरिक्षक असलेल्या अधिकार्याने दुकानात ठेवलेली 5 लाखांची रोकड व अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून लंपास केल्याची घटना जून्या अमरावती शहरातील पटवीपूरा भागात मंगळवारी उघडकीस आली. डॉ. निलेश प्रभुसिंग सोळंके यांच्या तक्रारीवरुन खोलापूरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार डॉ. निलेश सोळंके हे अमरावती महापालिकेत पशुधन निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते अंबागेट परिसरातील रहिवासी आहे. त्यांनी पटवीपूरा भागात माफले कॉम्प्लेक्समध्ये एक दुकान भाड्याने घेतले होते. सोळंके यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्यांनी घरातील काही साहित्य पटवीपुर्यातील या दुकानात ठेवले होते. दुकानातील एका लोखंडी कपाटात त्यांनी 5 लाख रुपयांची रोकडही ठेवली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे कुलुप तोडन आत प्रवेश केला आणि 5 लाख रुपयांच्या रोख रकमेसह एलसीडी टीव्ही व वॉशिंग मशिन असा एकुण 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोळंके यांनी याबाबत खोलापूरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.