क्यु आर कोडद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधणे झाले अधिक सुलभ
स्वीप उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

* मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते क्युआर कोडचे उद्घाटन
अमरावती /7 जानेवारी : शहरातील लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा तसेच आगामी अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या मालिकेत स्वीप कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण व तंत्रज्ञानाधारित पाऊल उचलण्यात आले असून, नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध व्हावी याकरिता विशेष QR कोड विकसित करण्यात आला आहे.
सदर QR कोडचे उद्घाटन नुकतेच अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, कोणत्याही मतदाराला माहितीअभावी मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
शहरातील विविध ठिकाणी QR कोड उपलब्ध-नागरिकांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा, याकरिता शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, व्यापारी संकुले, शासकीय व खासगी दवाखाने, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे तसेच नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या परिसरात हे QR कोड लावण्यात आले आहेत. नागरिक केवळ मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून काही क्षणांतच मतदार यादीतील आपले नाव, मतदार क्रमांक व संबंधित मतदान केंद्राची संपूर्ण माहिती मिळवू शकणार आहेत.
मतदान केंद्रांतील बदलांमुळे होणारी गैरसोय टळणार-लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारसंख्येत वाढ झालेली आहे. त्यानुसार काही मतदान केंद्रांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची गोंधळ, गैरसोय किंवा वेळेची नासाडी होऊ नये, यासाठी QR कोड सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून मतदारांना निवडणुकीपूर्वीच आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची अचूक माहिती मिळणार असून मतदानाच्या दिवशी आत्मविश्वासाने व वेळेत मतदान करता येणार आहे.
अधिकाधिक नागरिकांनी QR कोडचा वापर करण्याचे आवाहन-या उपक्रमाचा लाभ शहरातील प्रत्येक मतदाराने घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असून, महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या QR कोड सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून प्रत्येक पात्र नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे त्यांनी नमूद केले. अमरावती महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम आगामी निवडणुकांमध्ये मतदारांसाठी मार्गदर्शक ठरून मतदानाची टक्केवारी वाढविण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत
QR कोडद्वारे मिळणारी सोपी, जलद व पारदर्शक माहिती ही मतदारांसाठी मोठी सुविधा ठरणार असून, यामुळे नागरिकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः युवक, ज्येष्ठ नागरिक व पहिल्यांदाच मतदान करणार्या मतदारांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे




