सार्वत्रिक निवडणूक कामकाजाबाबत महानगरपालिकेत सविस्तर आढावा बैठक

अमरावती /2 जानेवारी : निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी येणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. ही बैठक ऑनलाईन अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा सखोल आढावा घेतला. मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, मतदान अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन, मतमोजणीची तयारी तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्याचे निर्देश देत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यावर विशेष भर दिला. कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त दादाराव डोलारकर, ऑनलाईन पध्दतीने सात झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे अमरावती महानगरपालिकेतील सार्वत्रिक निवडणूक तयारीला अधिक गती मिळाली असून, निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.




