महालक्ष्मी जिनिंगला भीषण आग, कोट्यावधीचे नुकसान
हजारो क्विंटल कापूस जळून खाक

भातकुली /31 डिसेंबर : शहरापासून काही अंतरावर असलेल्या गणोजा देवी रोडवरील महालक्ष्मी कापूस जिनिंग प्रेसिंग कंपनीला 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला असून प्राथमिक अंदाजानुसार कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या नियमांनुसार कापूस खरेदी व प्रेसिंग करीत आहे. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे उपस्थित असलेल्या असंख्य मजूर कामगारांमध्ये भीती पसरली. आग इतकी प्रचंड होती की अग्निशामक दलाचे वाहन दर्यापूर व अमरावतीहून बोलावून घटनास्थळी पाठवले, तरीही आग काही तासांपर्यंत वादळासारखी पेटत राहिली. भातकुली तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम आणि भातकुली पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, ही घटना महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये आग लागण्याची दुसरी घटना असून या ठिकाणी यापूर्वीही आग लागल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.सदर आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला असून, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवले आहेत. कंपनीकडून आणि प्रशासनाकडून आग लागण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, तसेच भविष्यात अशा दुर्घटनांपासून बचावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.




