रहाटगाव-छत्री तलाव मार्गावर मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ

दुचाकीवरील महिलेची प्रकृती चिंताजनक, पुरुष जखमी

* संतप्त नागरिकांनी दिला चांगलाच चोप

अमरावती /28 डिसेंबर : शहरातील रहाटगाव वरून छत्री तलावाकडे जाणार्‍या नॅशनल हायवेवर रविवार सायंकाळच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. एका मद्यधुंद वाहनचालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकी रस्त्यावर फरफटत गेली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी महिलेला मदत करत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सदर महिला दुचाकीवर मागे बसलेली होती, तर दुचाकी चालवणारा पुरुषही जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक देणारा चालक वेगात होता आणि वाहन चालवताना तो पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अपघातानंतर त्याची अवस्था अत्यंत बेशुद्धावस्थेत होती. अपघात घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. मद्यधुंद चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक महिला मृत्यूशी झुंज देत असल्याने संतप्त नागरिकांनी त्या चालकाला चांगलाच चोप दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परिस्थिती चिघळण्याआधीच त्या भागात पेट्रोलिंगवर असलेले आरटीओ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आरटीओ अधिकार्‍यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेतली आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनला घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, चालक अतिशय मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो कोणतीही सुस्पष्ट माहिती देऊ शकत नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून मद्यपान चाचणी, वाहन जप्ती व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे नॅशनल हायवेवरील वाढत्या मद्यधुंद वाहनचालकांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button