हरविलेल्या दिव्यांग युवतीचा मृतदेह आढळला
3 आठवडयापुर्वीच दिला होता हरविल्याबाबतची तक्रार

वरुड । 15 डिसेंबर – गेल्या 3 आठवडयांपुर्वी हरविलेल्या एका 25 वर्षीय अपंग युवतीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाई जंगलात आढळुन आला. ही युवती हरविली असल्याची तक्रार यापुर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे या युवतीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली? याबाबत तर्क वितर्क काढण्यात येत आहे. मुळची मध्यप्रदेशातील पेंडोनी जि.पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथील रहिवाशी असलेली रत्नमाला संतोष कवडेती (25) ही युवती तिच्या वडिलांसोबत बकर्या चरण्याकरिता गेली होती. बकर्या चारत असतांना वडील बकर्या घेऊन पुढे निघून गेले रत्नमाला ही मागे राहिली. ती मागे आली नसल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला मात्र ती दिसुन आली नाही. यानंतर गेल्या 28 तारखेला तिच्या वडिलांनी ती हरविल्याची तक्रार मध्यप्रदेश पोलिसात दिली व तिचा शोध चालविला होता. आज 15 डिसेंबरला शेंदूरजनघाट पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाई जंगलात तिचा मृतदेह आढळून आल्याची माहिती रत्नमाला हिचा भाऊ शिवपाल संतोष कवडेती याने पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने मृतदेहचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. रत्नमाला ही एक हात व एका पायाने अपंग होती तसेच ती मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी ठाणेदार दिपक महाडिक यांच्या मार्गदर्शनात उमेश बुटले, आम्रपाली घुरडे, सागर लेव्हरकर आदी तपास करीत आहे.




