महिलेचा हिजाब हटवल्याने नितीश कुमार चर्चेत

विरोधकांकडून त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली/15 डिसेंबर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. मात्र आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते एका कार्यक्रमात मुस्लिम महिलेचा हिजाब खेचताना दिसून येत आहेत. नितीश कुमार यांच्या या कृतीवर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी नितीश कुमार यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार यांच्या निवासस्थानी 1,283 आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिजाब घातलेली एक महिला डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी स्टेजवर आली होती. नितीश कुमार यांनी डॉक्टर महिलेला नियुक्ती पत्र दिले आणि तिच्याकडे हसून पाहिले. यावर महिलेने सुद्धा त्यांच्याकडे हसून पाहिले. मात्र त्यानंतर नितीश कुमार यांनी तिच्या चेहर्‍यावरून हिजाब खेचला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत नितीश कुमार यांनी डॉक्टर महिलेच्या चेहर्‍यावरून हिजाब काढला होता. नितीश कुमार यांच्या कृतीनंतर डॉक्टर महिला क्षणभर अस्वस्थ दिसत होती. त्यानंतर उपस्थित अधिकार्‍यांनी तिला स्टेजवरून खाली जाण्याचा इशारा केला. नितीश कुमार यांचा 13 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस आणि राजद पक्षाने देखील नितीश कुमार यांचा व्हिडीओ द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने म्हटले की, जेव्हा एक महिला डॉक्टर तिचे नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमार यांनी तिचा हिजाब ओढला. या कृत्याबद्दल नितीश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. कारण ही कृतीला माफी मिळू शकत नाही. तर राजदने म्हटले की, नितीश कुमार यांना काय झाले आहे? त्यांची मानसिक स्थिती अत्यंत वाईट स्थितीत पोहोचली आहे किंवा नितीश कुमार 100 टक्के संघाचे बनले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button