दिवसाढवळ्या शेतकर्याची फसवणूक

अमरावती /15 डिसेंबर : वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशनच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढत दिवसाढवळ्या शेतकर्याची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ‘चेंज स्कॅनिंग’ या प्रकारातून सोन्याची अंगठी व रोख रक्कम हिसकावून नेल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आलोडा येथील रहिवासी व शेतकरी श्री. साहेबराव जी. गावंडे हे दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी तलाठी कार्यालय, गाडेगाव येथील शासकीय काम आटोपून दुचाकीने आपल्या गावी परतत होते. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गाडेगाव ते आलोडा या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना थांबवले. तुमच्या हातातील अंगठी सोन्याची आहे की पितळची? अशी चौकशी करून त्यांनी विश्वास संपादन केला. अंगठी तपासण्याच्या बहाण्याने ती हातात घेत चलाखीने अदलाबदल करत बनावट अंगठी देऊन मूळ सोन्याची अंगठी तसेच काही रोख रक्कम लंपास केली. प्रकार लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती श्री. गावंडे यांनी तात्काळ बेनोडा पोलीस स्टेशन येथे दिली असून, अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.दरम्यान, बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या ‘चेंज स्कॅनिंग’ व भुरट्या चोरीच्या अनेक घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणार्या गुन्ह्यांमुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व सामान्य प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.दिवसाढवळ्या रस्त्यावरच अशा घटना घडत असताना पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर कडक नजर ठेवावी व गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत तर नागरिकांमधील रोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.




