महावितरणचे 2285 कंत्राटी कामगार कायम

न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

* जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी दिली माहिती

बुलढाणा/11 डिसेंबर : महावितरण मधील कंत्राटी कामगारांना न्यायालयाने मोठा दिलासा देत 2285 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरण मधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने 2012 साली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत (5656/2012 क्रमांकाची) याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे वर्ग करण्यात आले. एकूण 2285 कंत्राटी कामगार यात असून सातत्यपूर्ण 13 वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 17 जून रोजी न्यायाधीश एस.झेड.सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड ( निवाडा) जाहीर केला होता.
न्यायालयाचा हा अवॉर्ड ( निकाल ) काल 10डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे कामगार उपायुक्त ( औद्योगिक लवाद) ल.य.भुजबळ,यांनी अधिकृतरीत्या संघटनेला दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उप सरचिटणीस राहुल बोडके, संघटन सचिव उमेश आणेराव व कोषाध्यक्ष सागर पवार कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे उपस्थित होते.
निकालातील महत्त्वपूर्ण मुद्दे-महावितरण विभागातील कंत्राटी कामगार हे प्रत्यक्ष व कायम कामगार मानले जातील. कंत्राटदार ही व्यवस्था केवळ नाममात्र असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. सन 2012 पासून आतापर्यंतच्या कालावधीत महावितरणच्या कायम कामगारांप्रमाणे वेतन, भत्ते व सर्व तदनुषंगिक लाभ फरकासह देण्याचे आदेश. सहा महिन्यांच्या आत अनुषंगिक लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर 5 टक्के व्याज देणे बंधनकारक, हे निकालतील महत्त्वाचे ठळक मुद्धे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button