पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ‘फिरोज उर्फ बाली काझी’ अटकेत

नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

अमरावती /3 डिसेंबर : शहरातील सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. शहरातील कुख्यात गुन्हेगार फिरोज काझी उर्फ बाली जहीरोद्दीन काझी (वय 33, रा. इकबाल कॉलनी) यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश देत 3 डिसेंबर 2025 रोजी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करण्यात आले. सतत वाढत असलेल्या त्याच्या गुन्हेगारी हालचालींना आता पोलिसांनी मोठा आळा घातला आहे.
सन 2021 पासून फिरोज काझी हा गुन्हेगारी जगतात सक्रिय असून, त्याच्यावर नागपुरी गेट पोलिस ठाण्यात दुखापत
करणे, गंभीर मारहाण, धमकी देणे, खंडणी, शांतता भंग, अश्लील वर्तन, अंमली पदार्थ बाळगणे, अवैध शस्त्रे
बाळगणे, हद्दपारीचे व अधिसूचनांचे उल्लंघन, अशा स्वरूपाचे एकूण 8 गंभीर गुन्हे नोंद आहेत. या पूर्वीही त्याच्या वर तडीपारी व विविध प्रतिबंधात्मक कारवाया झालेल्या असूनही तो गुन्हेगारीतून परावृत्त झाला नव्हता.
या गुन्हेगाराविरुद्ध कठोर उपाययोजना म्हणून नागपुरी गेट पोलिस ठाण्यातून पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे यांनी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील (गाडगेनगर विभाग), परिमंडळ 1 चे उपअधीक्षक गणेश शिंदे, उपअधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पाठवण्यात आला. प्रस्तावाची तपासणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता गुन्हे शाखेतील एमपीडीए सेल तसेच नागपुरी गेट पोलिस ठाण्यातील पथकांनी काटेकोरपणे केली. या कार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे, अजय मिश्रा, चेतन कराडे तसेच पोलीस कर्मचारी आनंद ठाकुर, मंगेश बोरकर यांनी विशेष योगदान दिले. संपूर्ण प्रस्तावाची सखोल छाननी केल्यानंतर पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. आदेश तामिल करून त्याच दिवशी फिरोज काझी यास मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. अमरावती शहरात आगामी सण-उत्सवांच्या गर्दीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणीही पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांचे हालचालीवर शिसारीचं निरीक्षण सुरू असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी आणखी कडक कारवाया केल्या जाणार असल्याचा इशारा आयुक्तालयाने दिला आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अमरावती पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम आगामी दिवसांमध्ये आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button